मुरुड जंजिरा । लोकप्रतिनिधींना लोक मते देऊन मोठ्या विश्वासाने निवडून देत असतात. निवडून आल्यावर लोकांची कामे करणे हे लोकप्रतिनिधींचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. परंतु, येथील स्थानिक शेतकरी कामगार पक्ष फसवी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करून सूचित केलेली कामे त्यांना कधीच पूर्ण करता आलेली नाहीत. दिशाभूल करण्यात यांचा अग्रक्रम असून सातत्याने फसवणूक झाल्याने स्थानिक आमदार यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी आहे. हेच बघा ना मुरुड तालुक्यातील आंबोली धरणातील रखडलेल्या कालव्यांसाठी स्थानिक आमदार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनकडून 12 कोटी रुपये मंजूर केल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. काय झाले 12 कोटींचे याबाबत त्यांनी मंत्रालयातून मंजूर केलेल्या निधीचा एक कागद तरी दाखवणे आवश्यक होते. अजून या ठिकाणी कामच सुरू झालेले नाही. या सर्व प्रकाराला जनता कंटाळी असून, याचा फायदा भविष्यात भाजप घेणार रायगड जिल्ह्यात आपली एक वेगळी शक्ती निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केले.
बहुसंख्य पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार
भारतीय जनता पक्षाची आगामी काळातील रूपरेषा समजावून सांगण्यासाठी मुरुड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, मुरुड शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, संजय गांधी निराधार योजनेचे मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, मयूर मानकर, बाळा भगत, उमेश माळी, नयन कर्णिक, नैनिता कर्णिक उदय सबनीस, संजय भायदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहिते म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. योजना पूर्ण होऊनसुद्धा लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. बहुंवशी योजना या फेल गेल्या आहेत. याबाबत पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे असंख्य तक्रारी आलेल्या असून, पालकमंत्री यांनी सात अभियंत्यांची समिती गठित केली आहे. ही समिती रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा व्यवस्थित अभ्यास करून पालकमंत्री यांना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर ज्या योजनेत भ्रष्टाचार झालेला आहे त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
मुरुड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका
यावर पत्रकारांनी मोहिते यांच्या निदर्शनास आणून दिले की, सदरची कार्यवाही कधीच पूर्ण होणार नाही. कारण शेकाप आमदारांचे भाजप मंत्र्यांशी घनिष्ट संबंध आहेत. यावर मोहिते यांनी सांगितले की पालकमंत्री भ्रष्टाचार करणार्यांना कधीही माफ करणार नाही. भारतीय जनता पार्टीचे सरकार सतेवर येताच सागरमाला योजनेअंतर्गत मांडवा ते गेटवे या रो रो सेवेला एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे. भविष्यात मांडवा ते राजपुरी ही रो रो सेवाही सुरू होणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. प्रत्येक विकासकामे आम्ही केली, असा कोणीही कांगावा करू नये. भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्याकडे आल्याशिवाय पर्याय नसल्याचे यावेळी मोहिते यांनी स्प्ष्ट केले.15 दिवसांच्या आत पालकमंत्री मुरुड तालुक्याचा दौरा करणार असून, अनेकांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. लवकरच मुरुड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून, यामध्ये भाजप चांगली कामगिरी करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
मुरुड तालुक्यातील 72 बूथपैकी 71 बूथ गठित करण्यात आले आहेत.प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करत असून, याचा आम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा होणार असल्याचे सांगितले. गुढी पाडव्यानिमित्ताने साळाव ते तळेखार स्वागतयात्रा भाजपतर्फे काढली जाणार आहे. यावेळी शिरगाव गावात व्यायाम शाळा, साळाव स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या लोकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.