देहूरोड । देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळवडे येथील कास्टींगचे इन्व्हेस्टमेंट डाय तयार करणार्या कंपनीला शनिवारी सकाळी अचानक आग लागली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार अग्निशमनदलाच्या गाड्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मोल्ड तयार करणारी यंत्रे आगीत वितळून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, देहूरोड पोलिसांकडून या घटनेची माहिती घेण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
अडीच तासांनंतर आग आटोक्यात
अशोका आयर्न या कंपनीतून प्रचंड धुराचे लोट येत असलर्याचे आसपासच्या नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ कंपनीचे मालक रमेश अगरवाल व अग्नीशमन विभागाला या घटनेची माहिती दिली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात जवानांना यश आले. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिस निरीक्षक अरूण मोरे यांनी सांगितले. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.