आगीत फर्निचरचे गोडाऊन खाक

0

पुणे । मोमीनपुरातील चाँदतारा चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना बुधवारी (दि. 8) पहाटे 3.30 वाजता घडली. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे दुकानाजवळील वस्तीत आग भडकण्याचा अनर्थ टळला. सुदैवाने या यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

चाँदतारा चौक येथे सागवानी फर्निचरचे तसेच फॅब्रिकेशनचे कपाट बनविण्याचे दुकान आहे. शॉर्ट सर्किटमुळे त्याला पहाटे आग लागली. गोडाऊनमधून धूर निघल्यानंतर नागरिकांना येथे आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला याची माहिती दिली. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. गोडाऊनमध्ये फर्निचरचे सामान, कपाट आदी वस्तू होत्या. अग्निशामक दलाच्या 4 गाड्या व दोन टँकरच्या सहाय्याने ही आग नियंत्रणात आणली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने संभाव्य धोका टळला. ही कामगिरी फायरमन सय्यद शफिक शेख, मंगेळ मिळवणे, योगेश चोरगे, प्रमोद ढसाळ, प्रदीप खेडेकर, टिंगळे, ड्रायव्हर कोळी आदींनी बजावली.