निवडणुकीसाठी आघाडीचे गाडे पुढे सरकले

0

जळगाव । आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. यासाठी जिल्हा परिषदवर आपला झेंडा रोवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रस यांनी एकत्रीतरित्या लढण्याची तयारी दर्शविल्यानंतर आज झालेल्या दुसर्‍या बैठकीत सकारात्मक निर्णय व जागा वाटपाबाबत चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस भवनात करण्यात आले. या बैठकीत काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव डी.जी.पाटील, सरचिटणीस अजबराव पाटील तर राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतीष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे, माजी जि.प.अध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जि.प.सदस्य संजय गरुड आणि विकास पवार यांची उपस्थिती होती.

23 रोजी अंतिम निर्णय
23 रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांकडून सकारात्माक निर्णय घेवून संयुक्तरित्या निवडणूक लढवण्यात यावेळी यासाठी दोघी पक्षांतर्फे प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील व काँग्रेसचे विनायक देशमुख यांच्या उपस्थिती अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. शनिवार 21 रोजी झालेल्या बैठकीतही निवडणूकाच्या जागा वाटपासंदर्भात विचार विनीमय करत अंतिम निर्णय सोमवार 23 रोजी देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतीष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलतांना म्हणाले की, मागील निवडणूका पैश्याच्या जोरावर जिंकले. मात्र, आता तसे होणार नाही, असा टोला आमदार डॉ.पाटील यांनी जलसंपदा मंंत्री गिरीष महाजन यांना मारला. गेल्या पंधरा वर्षापासून भाजपाची जिल्हा परिषदेवर सत्ता असल्याकारणामुळे शेतकरी वर्ग विनाकारण भरडला जात आहे. राज्यात आघाडी सरकार असतांना शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणारे जनसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या सत्तेच्या कार्यकाळात शेतकर्‍यांसाठी कापसासह इतर पिकांना भाव दिला नाही. त्यामुळे आता ‘जलसंपदा विरुद्ध जनसंपदा’अशी ही निवडणूक असून शेतकर्‍यांमध्ये असलेला रोष आता निकालानंतर समजेलच. जामनेर तालुक्यात असलेल्या जि.प.च्या 7 जागांपैकी 5 जागांवर आघाडीचे उमेदवार येणार असल्याची ग्वाही जि.प.सदस्य संजय गरुड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आता दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निष्पक्ष व पारदर्शकेतेने ग्रामीण भागात चांगल्या रितीने प्रचारात सहभागी झाले आहे असे ते म्हणाले.