मुंबई । लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण लागू करावे, अशी मागणी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे तसेच चौंडी येथे धनगर समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. धनगर समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी धनगर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी पत्रकारपरिषदेत केली आहे.
समाजातील काही नेते समाजाच्या जीवावर सरकारमध्ये जाऊन मंत्रिमंडळात बसले आहेत. मंत्रिमंडळातील याच नेत्यांकडून समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोपही सूर्यकांत कांबळे यांनी पत्रकारपरिषदेत केला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धनगर समाजातील काही तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेऊन अटक करण्यात आलेल्या तरुणांना तत्काळ सोडण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. चौंडी येथील घटनेमध्ये 51 जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांना अजूनही कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्यावर कलम 307 नुसार गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना जामीन मिळू शकलेला नाही.
सरकारला जर धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच असेल तर ते आरक्षण निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी द्यावे, आचारसंहिता लागल्यानंतर आरक्षणाचे गाजर दाखवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून केला जाईल, अशी शंका आहे. त्यामुळेच निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने धनगरांना आरक्षण दिले नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.