आचारसंहितेमुळे ग्रामसभा रद्द

0

जळगाव । राज्यातील काही ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यतील 107 ग्रामपंचायतीचे निवडणुक होणार आहे. येत्या 27 में रोजी ग्रामपंचायतसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीची आचार संहिता लागु करण्यात आली आहे. दरम्यान 1 में रोजी महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेणे अनिवार्य होते. मात्र जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी आचार संहितेमुळे ग्रामसभा रद्द केली. महाराष्ट्र दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभेत ग्रामपंचायतींच्या अजेंड्यावर महत्त्वाचे विषय होते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 3 (1) नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा वर्षारंभानंतर दोन महिन्यांत घेणे बंधनकारक असते. वित्तीय वर्षारंभाची पहिलीच ग्रामसभा महाराष्ट्र दिनानिमित्त 1 में रोजी घेण्यात येत असते.

महत्वपूर्ण विषय अडकले
वित्तीय वर्षानंतर पहिलीच ग्रामसभा 1 में रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त घेण्यात येत असते. यावर्षी होणार्‍या ग्रामसभेच्या अजेंड्यावर अनेक महत्त्वपूर्ण विषय होते. 14 व्या वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीला मिळणार्‍या निधीबद्दल चर्चा, ग्रामविकासासाठी होणारे महत्त्वपूर्ण ठराव आदी विषय आचार संहितेमुळे अडचणीत आले आहे.

वृक्ष लागवडीबद्दल जनजागृती
राज्यभरात वृक्षलागवडीबाबत जनजागृती व्हावी, ग्रामसभांमधून नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यासाठी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभांमध्ये या विषयी चर्चा घडवून आणण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 1151 ग्रामपंचायतींना आदेश पारित केले होतेे. आचार संहितेमुळे ग्रामसभा न झाल्याने वृक्ष लागवडी विषयीची माहिती जनतेपर्यत पोहोचु शकली नाही. जिल्हा भरात 50 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रती ग्रामपंचायत 375 वृक्ष लागवड कराची आहे.

शाळा विकासाचे मुद्दे
शाळा विकासासाठी आजपर्यत राज्य शासनामार्फत निधी पुरविला जाई. मात्र या वर्षापासून ग्रामपंचायतींना मिळणार्‍या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतुन 25 टक्के निधी गावातील शाळा विकासासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ग्रामसभेत या विषयी ठराव पास करण्यात येणार होता. शाळा मुख्याध्यापक या ग्रामसभेला हजर राहणार होते. मुख्याध्यापकांना शाळा विकासाचे मुद्दे ग्रामसभेत मांडावयाचे होते. ग्रामसभा न झाल्याने शाळा विकासाचे मुद्दे मात्र अडकले आहे.