पुणे : रावणाला आपण नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत पाहत असल्याने तो धूसर होत चालला आहे. त्याला कितीही गाडायचा प्रयत्न केला तरीही गाडू शकत नाही. रावण दहा डोक्यांनी विचार करणारा बुद्धिमान योद्धा होता. आज आपल्याला एका बाजूनेच विचार करण्याची सवय लागली आहे. घटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे आजच्या काळात आपण रावणाची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित उद्योजक शरद तांदळे यांच्या ‘रावण : राजा राक्षसांचा’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात नागराज मंजुळे बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या सोहळ्यावेळी ज्ञानेश महाराव, रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रवीण गायकवाड, अभिनंदन थोरात, शोभा तांदळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रावण आता नायक झाला
रामराज्याच्या काळात रावण हा विषय घेऊन पुस्तक लिहिण्याचे धाडस करणे ही कौतुकाची गोष्ट आहे. माणूस वाईट नसतो, काळ-वेळ परिस्थिती त्याला घडवत असते. रावण आता खलनायकाचा नायक झाला आहे. राम जन्माला आला तर रावण डोकावणारच आहे. सध्या राममंदिरासाठी मशिद पाडण्याचे वातावरण देशात आहे. अशा वातावरणात शरद तांदळे यांची रावण ही कादंबरी आपल्या समोर आली असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. रावणाविषयी वाचन केले आणि त्याविषयी लिहीत गेलो. या पुस्तकासाठी मी 4 वर्षे अभ्यास केला. रावणाला नेहमी खलनायक ठरवले जाते. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचले पाहिजे आणि लिहिते व्हायला पाहिजे, असे शरद तांदळे यांनी सांगितले.