पंढरपूर: यंदा प्रथमच कोरोनाच्या संकटामुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला भाविक मुकले आहे.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा केली. आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, आणि निरोगी जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडे घातले. करोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.
”आपण सगळे जण माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी. माऊलीच्या समोर सगळे सारखेच आहेत. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता.मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे. मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.