चाळीसगाव। चाळीसगाव शहरात आमदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतुन 30 जुलै पासून प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज सलग तिसर्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरलेल्या विजय चौधरी, सुप्रसिध्द सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्लॅस्टिक पदार्थ विघटनास अवघड असल्याने त्याचे अधिक काळ विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होते. प्रदुषणावर मात करण्यासाठी प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जनजागृतीतुन कापडी पिशवीचा देखील वापर वाढला आहे. शासनातर्फे देखील पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.
संगणकीय सादरीकरण करणार
यावेळी प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव यावर सहयोग फाऊंडेशन, मैत्र जीवाचे ट्रस्ट मुंबई तर्फे संगणकीय सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच अभियानासाठी घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव शहराला 10 हजार कापडी पिशव्यांचे वाटप करणार्या दात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अभियानात सहभागाचे आवाहन
‘माझे चाळीसगाव, माझा अभिमान’, ’प्लास्टिकमुक्त शहर आमचे’ असा नारा देत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी प्लॅस्टिक वापरावर निर्बध आणावे असे आवाहनही करण्यात येत आहे. प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव अभियानात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने राजपूत मंगल कार्यालय येथे रविवारी 30 रोजी सकाळी 10 वा. उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण, नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.