नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपचे दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. या अधिवेशनासाठी १३ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार सांगितले जात आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह पक्षाचे केंद्रीय मंत्री विविध राज्यांतील मंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, संसदेतील सदस्य, विधानसभांतील सदस्य, विविध शहरांतील पक्षाचे महापौर दिल्लीत दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात अमित शहा बीजभाषण करणार आहेत.
या अधिवेशनात एकूण ३ प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन प्रस्ताव राजकीय स्वरुपाचे आणि एक धन्यवाद प्रस्ताव असेल. देशातील सवर्णांना आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात येईल. अधिवेशात माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीही वाहण्यात येईल. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना नरेंद्र मोदी या भाषणात कोणते मुद्दे मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
रामलीला मैदावावर अस्थायी स्वरूपाचे पंतप्रधान कार्यालय उभारण्यात आहे, येथूनच दोन दिवस पंतप्रधान मोदी कामकाज करणार आहे.