आजपासून महागाईचे ‘बुरे दिन’!

0

नवी दिल्ली : नवीन वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून (1 एप्रिल) सुरु होत असल्याने केंद्र सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकाची अमलबजावणीदेखील सुरु होत आहे. नवीन आर्थिक वर्षात केंद्राने जे करप्रस्ताव मांडले होते, त्यांची अमलबजावणी सुरु होत असून, त्यामुळे महागाई आणखी वाढणार आहेत. या शिवाय, प्रत्येक खरेदीवर शिक्षण व आरोग्य अधिभार एका टक्क्याने वाढल्याने प्रत्येक वस्तू महाग होणार असून, महागाईचे ‘बुरे दिन’ सुरु होणार आहेत. पूर्वी हा अधिभार तीन टक्के होता तो आता चार टक्के होईल. तसेच, प्राप्तिकर भरणार्‍यांना एक टक्के उपकरदेखील द्यावा लागणार आहे. कररचनेत झालेला बदल, सार्वजनिक वाहनांत जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमची अमलबजावणी, कस्टम ड्युटीत झालेली वाढ यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूही महागणार असून, दोन टक्क्यांनी आयातशुल्क वाढले आहे. तसेच, टाईल्स, हार्डवेअर हे सामानदेखील पाच टक्क्यांनी महागणार आहे.

ई-वे बिल प्रणाली लागू होणार
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या शेवटच्या संपूर्ण अर्थसंकल्पात कररचनेत फारसा बदल केला नव्हता. पण अतिश्रीमंतांवर 10-15 टक्के अधिभार कायम ठेवत, इतर सर्व प्रकारच्या करयोग्य उत्पन्नावरील आरोग्य आणि शिक्षण उपकर लागू केला. पूर्वी तीन टक्के असणारा हा उपकर आता चार टक्के होईल. आजपासून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्यांच्या आंतरराज्य मालवाहतुकीवर इलेक्ट्रॉनिक्स बिल अथवा ई-वे बिल प्रणालीही लागू होणार आहे. जीएसटीमध्ये ई-वे बिल प्रणालीची तरतूद असून, यामुळे कर संकलनात वाढ होईल, असे सरकारला वाटते.

नवी आरोग्य योजना सुरू होणार
शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबासाठी 5 लाख रुपयांची दरवर्षी हॉस्पिटलायझेशनसाठी तरतूद केली आहे. 70 लाख नव्या नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन मोदी सरकारने दिले आहे. या नव्या नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार आहे. सध्याच्या नोकरदारांसाठी पीएफमध्ये सरकारचा वाटा 8.33 टक्के इतका आहे.

1. आजपासून बँक खात्यांना आधार क्रमांक जोडणे अनिवार्य होणार
2. बँकांतील मिनिमम बॅलन्स चार्जमध्ये 75 टक्के सूट मिळणार
3. टपाल कार्यालयांत पेमेंट बँकिंगची सुविधा मिळणार
4. ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगवर करसूट मिळणार
5. लाखापेक्षा जास्त रकमेच्या शेअर विक्रीवर 10 टक्के कर
6. तंबाखु, सिगारेट महागणार, रुम फ्रेशनर, परफ्यूम, चष्मेही महागणार