संविधान सन्मान समितीतर्फे ‘भारतीय संविधान आणि स्त्री’ यावर चर्चा
पुणे : आपल्या देशात अनेकदा स्त्रीचे चित्रण चूल आणि मूल सांभाळणारे सोशिक व्यक्तिमत्त्व अशाप्रकारे करण्यात आले आहे. अनेक जुन्या चित्रपटांतूनही ते दिसते. आपल्या देशात असलेली असमानता, दारिद्य्र त्याला कारणीभूत असावे; पण आता काळ बदलूनही काही ठिकाणी स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याचे प्रकार घडतात. पैसा आणि राजकारणासाठी स्त्रियांना ‘चेहरा’ बनवले जाते. मात्र, खर्या अर्थाने विकास साधायचा असेल, तर स्त्रीला पुरुषाप्रमाणेच समान हक्क मिळायला हवेत, असे सांगत महापौर मुक्ता टिळक यांनी पुरुषी मानसिकतेवर प्रहार केला. संविधानामुळेच स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीतर्फे आयोजित संविधान कट्ट्यावर त्या बोलत होत्या. यावेळी ‘भारतीय संविधान आणि स्त्री’ या विषयावर चर्चा करण्यात आली. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर, चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, रमा करोते, रमणी हजारे उपस्थित होते.
संविधानात समान वेतनाचा हक्कही
मुक्ता टिळक म्हणाल्या, संविधानात स्त्रियांना स्वातंत्र्य, शिक्षण असे हक्क देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून अनेक वाईट गोष्टींचा निषेध करून स्त्रियांनी स्वत:च्या हक्कासाठी लढायला हवे. समान वेतन हा हक्कही संविधानात देण्यात आला आहे. जेव्हा एखादी महिला डोक्यावरून दगड वाहते, तेव्हा तिच्या ताकदीचा दुरुपयोग होतो. पूर्वी चालत आलेली सती प्रथा, विधवांचे मुंडन, स्त्रियांनी दागिने घालू नयेत, अशा अंधश्रद्धा या सर्वांचा त्याग करण्याची तरतूद संविधानात आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येकाने करायला हवी. महिलांना शिक्षण मिळाले, तर त्या कुठल्याही कार्यक्षेत्रात उच्च पातळी गाठतील.
धार्मिक भावना जोपासण्यामुळेच संस्कृतीला तड
मुक्ता मनोहर म्हणाल्या, भारतात स्त्रिया अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. विज्ञान, तंत्रज्ञान याकडे जग वळत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनात आपण कमी पडत आहोत, याची खंत वाटते. हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. विविधतेने नटलेल्या या देशाचा सन्मान करणारी आपली संस्कृती मोठी आहे. सध्या धार्मिक भावना जोपासल्या जात असून, त्यामुळेच या संस्कृतीला तडे जात आहेत. आपण धर्म, जात बाजूला ठेवून एक माणूस म्हणून जगायला सुरुवात करायला हवी.