आजी-आजोबा रमले नातवंडांच्या शाळेत, को.ए.सो वाजेकर शाळेचा उपक्रम

0

पनवेल । शाळेतले विश्‍व बहुतांशी आई-बाबा, शिक्षक, विद्यार्थी यांच्याभोवतीच फिरत असते. आजी-आजोबांचा नातवंडांच्या शाळेशी तसा संबंध येत नाही. पण शनिवारी ता. 3 रोजी को.ए.सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माद्यम शाळेमध्ये आजी-आजोबांना खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. निमित्त होते, आजी-आजोबा दिवसाचे. आजी-आजोबांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तशी मिळत नाही. पण पनवेल येथील को.ए.सो. इंदुबाई वाजेकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना तो दिवस त्यांच्या आजी-आजोबांसाठी यादगार बनवला. भांगडा, कोळीनृत्यापासून मंगळागौरीचे खेळ त्यांनी पेश केले.

आजी-आजोबांसोबत खेळले खेळ
आजी-आजोबा आणि नातवंडे या नात्यावर बेतलेली जुनी गाणी, कविताही विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यामध्ये वेगवेगळे खेळ आजी-आजोबा नातवंडांसह खेळले. गाण्यात आजी-आजोबांनीही सूर मिसळला होता. मुले लहान असताना ती आमच्यासोबत असतात. एकदा शाळेत जायला लागली की त्यांचे वेगळे विश्‍व तयार होते. पण या त्यांच्या विश्‍वात त्यांनी आम्हालाही सामावून घेतले, याचा खरेच खूप आनंद झाला. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कधी गंमत, मस्ती तर कधी भावनिक क्षणांच्या या कार्यक्रमामुळे आमच्या आणि नातवंडांमधील नात्याची वीण अधिकच घट्ट झाली, अशा शब्दांत आजी-आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. साधारणतः शंभर जण यात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापिका अंजली उरेकर, उपमुख्याधापिका मनीषा पाटील, मानसी कोकीळ आदींसह पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

ज्या पद्दतीने विधार्थी आणि आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे भविष्यात देखील या शाळेत अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही साजरे करणार आहोत.
– अंजली उरेकर
मुख्याध्यापिका.