सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 125 वे वर्ष की 126 वे वर्ष यावर पुण्यात चर्चा सुरू आहे.त्यात आज न पडता हे मान्य करावे लागेल की,गणपती उत्सवाचा या महाराष्ट्राच्या समाजकारणावर,राजकारणावर एक प्रभाव आहे.त्या वेळच्या ब्रिटिश सत्ते विरोधात लोकांना एकत्र करण्याच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पुरेपूर उपयोग करून घेतला.आणि ते त्या काळात योग्यही होते.गणेशोत्सवाच्या माध्यमातून मेळे,व्याख्याने, चर्चा यातून समाज प्रबोधना बरोबरच ब्रिटिश सत्ते विरुद्ध लोकांना संघटित करण्याचे काम केलं. मात्र त्या वेळच्या उत्सवाचे उद्दीष्ट आजच्या सार्वजनिक मंडळा समोर राहिले आहे का ?हा कळीचा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात आज मितीला धर्मादाय आयुक्तांकडे नोंद केलेले सुमारे 67000 गणपती मंडळे आहेत आणि नोंद न केलेले किती तरी असतील ही सारी एकत्रित मंडळाची संख्या एक लाखाच्या वर जाते.एकट्या मुंबईत ही संख्या दहा हजार असावी.एवढी मोठी आर्थिक आणि मनुष्यबळ असलेली ताकद विधायक कामाकडे का वळविली जात नाही. एवढी ताकद असतानाही हे राज्य सामाजिक दृष्ट्या प्रगत असायला हवं होतं.ज्या लोकमान्यांनी ज्या उद्देशाने हे सारे केले त्या उद्देशाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न काही मंडळ निश्चित करताहेत परंतु हे प्रमाण अल्प आहे.या मंडळाचे कार्यकर्ते,त्यांचे आर्थिक गणित,सजावट,मिरवणूक या वर चर्चा करण्यापेक्षा ही विधायक ताकद समाजाच्या उपयोगी कशी येईल यावर चर्चा झाली पाहिजे. शेतकर्यांची आत्महत्या,दुष्काळ,पाण्याचा प्रश्न,पर्यावरण, आरोग्य,स्वच्छता, जंगल,नर्मदेच्या खोर्यातील आदिवासी पासून मुंबईच्या एसआरए- योजनेतील पुनर्वसन इथ पर्यंत केवळ देखावे करून आणि सामाजिक संदेश देऊन भागणार नाही तर या प्रश्नांना भिडावे लागेल.प्रकाश आमटे,अभय बंग, अमीरखान,नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे,मेधा पाटकर या सारखी अनेक माणसे या क्षेत्रात काम करताहेत ,त्यांच्या कामात सहभागी व्हावे लागेल तेव्हा टिळकांच्या उद्देशाकडे आपण चाललो आहोत असे वाटेल.आणि लोकही अशा मंडळाच्या पाठीशी उभी राहतील.बाबा आमटे नेहमी म्हणत महात हे उगारण्या साठी नकोत तर हात हे उभारण्या साठी हवेत.
मी सलग सहा वर्षे मुंबईतील एका गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होतो. माझ्या सोबत शिक्षित आणि नोकरी उद्योग करणारी मंडळी पदाधिकारी म्हणून काम करीत होती.हे सांगण्याचे कारण म्हणजे,लोकांमध्ये उगाच गैरसमज असतो की,यात काम करणारे रिकामटेकडे असतात,नुसती वर्गणी मागतात.तर हे असं नसतं.अनेक मंडळाचे कार्यकर्ते हे उच्चशिक्षित आणि डोक्यात नवनवीन कल्पना घेऊन आलेले असतात.तर मुद्धा हा की,आम्ही दहा दिवस मंडपाच्या मागे जागरणाच्या नावाखाली चालणारा पत्याचा खेळ बंद करून टाकला.दहा दिवस आरती करण्यासाठी विभागातून वेगवेगळ्या लोकांना बोलाविले. त्या कुटुंबाला जोडून घेतले.कीर्तन,काव्यवाचन,परिसंवाद असे कार्यक्रम दहा दिवस सुरू ठेवले.समाजात घडणार्या घटनांवर मान्यवरांना बोलावून प्रश्न समजावून घेतले.अनाथ,वंचितांशी नातं जोडून घेतलं,मिरवणुकीत चालणारा डीजे,मस्ती पूर्ण आटोक्यात नाही पण कमी करण्यावर भर दिला. ज्यांचा उद्योग आणि उद्देश मर्यादित होता असे मूठभर लोक दुखावले हे निश्चित. सांगण्याचा मुद्धा असा की,जर महाराष्ट्रातील या एक लाख मंडळांनी ठरवलं तर अनेक सामाजिक प्रश्नाची कोंडी फुटू शकेल.आज श्रद्धेच्या नावावर अनेक लोकांनी बाजार मांडला आहे.धर्माच्या,जातीच्या,भाषेच्या प्रश्नावरून लोकांचे शोषण केलं जात आहे.आपण सारे भारतीय घटना मानणारे आहोत.
या संविधानाच्या चौकटीत काम करून अनेक सामाजिक प्रश्नांना भिडता येईल. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि पहिली शिवजयंती सुरू करणारे महात्मा फुले यांच्या पासून सुरू झालेली सामाजिक प्रबोधनाची परंपरा आजही जिवंत आहे.स्वातंत्र्य लढा,बेचाळीसचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळी पासून ते शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,गाडगे बाबा,ते दाभोलकर, पानसरे यांच्या पर्यंत जिवंत आहे.या सामाजिक प्रबोधनाच्या दिंडीत सामील होऊन ही विधायक ताकद वापरायची की दहा दिवसानंतर विझू द्यायची याचा निर्णय घेण्याची सुबुद्धी आजच्या दिवशी सर्वाना देवो ही त्या गणराया कडे प्रार्थना….
शरद कदम- 9224576702