सत्ताधार्यांनी 5262 कोटींच्या अंदाजपत्रकावरील चर्चा दोन वेळा टाकली होती लांबणीवर
गेल्या वर्षी अवघ्या दहाच मिनिटांत दिली होती मंजूरी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षांच्या 5262.30 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकावरील चर्चा सत्ताधार्यांनी दोनदा लांबणीवर टाकली होती. आता अंदाजपत्रकावरील चर्चेच्या विशेष तहकूब सभेचे मंगळवारी सकाळी अकरा वाजता आयोजन केले आहे. उद्याच मार्च महिन्याच्या नियमित सर्वसाधारण सभेचे दुपारी दोन वाजता आयोजन केले आहे. त्यामुळे अंदाजपत्रकावर सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत केवळ तीन तासच चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गतवर्षी सत्ताधार्यांनी केवळ दहा मिनिटात अंदाजपत्रक मंजूर केले होते. यावेळी देखील अंदाजपत्रकावर अधिक चर्चा होऊ द्यायची नाही, असा इरादा सत्ताधार्यांचा असल्याचे सभा तहकुबीवरुन दिसून येत आहे.
दोनवेळा सभा केली तहकूब
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मूळ 3500 कोटी तर जेएनएनयूआरएमसह 5235 कोटींचा अर्थसंकल्प 15 फेब्रुवारीला स्थायी समितीला सादर केला होता. त्याचदिवशी सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा केली. त्यामध्ये उपसुचनांद्वारे 27 कोटी रुपयांची वाढ केली. त्यामुळे अर्थसंकल्प 5262.30 कोटींवर पोहचला आहे. त्यानंतर समितीने लगेच मंजुरी देऊन हा नवा विक्रम नोंदविला होता. तत्कालीन अध्यक्षा सीमा सावळे यांनी 26 फेब्रुवारी रोजी महासभेसमोर अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून ही सभा नऊ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली होती. पुन्हा नऊ मार्चला देखील श्रद्धांजली वाहून ही सभा तब्बल 11 दिवस म्हणजे 20 मार्चपर्यंत तहकूब केली होती.
चर्चा लांबणीवरचे कारण काय?
आता मंगळवारी ही विशेष सभा होणार आहे. उद्याच मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकावर केवळ तीन तास चर्चा करुन सर्वसधारण सभेचे कारण पुढे करत अंदाजपत्रक मंजूर करुन घेण्याचा सत्ताधार्यांचा इरादा असल्याची, चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. गतवर्षी सत्ताधार्यांनी पालिकेचे अंदाजपत्रक केवळ दहा मिनिटात मंजूर केले होते. त्यावेळी अंदाजपत्रकाला निवडणुकीमुळे विलंब झाल्याचे कारण दिले होते. त्यामुळे सत्ताधार्यांवर मोठी टीका झाली होती. यंदाही सत्ताधारी त्याच मार्गाचा अवलंब करत असल्याचे दिसून येत आहे. यंदा तर प्रशासनाच्या अंदाजपत्रकावर सत्ताधार्यांचीच छाप आहे. तसेच अंदाजपत्रक प्रशासनाने वेळेत समितीला सादर केले. स्थायी समितीने देखील एकाच दिवशी अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन विक्रम केला होता. तरीही, अंदाजपत्रकावरील चर्चा लांबणीवर का? टाकली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विरोधात असताना तासतासभर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना अंदाजपत्रकावर अधिक चर्चा होत होती. आताचे विरोधक त्यावेळी तास-तासभर अंदाजपत्रकावर भाषण करत होते. परंतु, त्यांची सत्ता येताच गतवर्षी केवळ दहा मिनिटात अंदाजपत्रक मंजूर केले. यावेळी अंदाजपत्रकावरील चर्चा लांबणीवर टाकली जात आहे. पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. पुण्यात अंदाजपत्रकावर दोन दिवस चर्चा झाली. त्यानतंरच अंदाजपत्रक मंजुर केले. पिंपरी महापालिका अनेक कामे पुणे महापालिकेच्या धर्तीवर करत असते. त्यामुळे अंदाजपत्रकावरील चर्चा देखील पुण्याच्या धर्तीवर अधिक चर्चा करावी, अशी अपेक्षा विरोधकांकडून केली जात आहे.