मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांच्या मतदान क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्यादृष्टीने दोन तासांची सवलत देण्याबाबत योग्य ते निदेश सर्व संबंधितांना तत्काळ देण्याबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलतही
पहिल्या टप्प्यातील यवतमाळ जिल्हा परिषदेतील 9-कुंभामार्डी, 13 घोन्सा कायर, 28-वटफळी, 32-लाडखेड , 38-दुऊरवाडी , 61-विडूळ हे 6 निवडणूक विभाग व त्याअंतर्गत 12 निर्वाचक गण तसेच वर्धा जिल्हयातील आर्वी पंचायत समिती अंतर्गत 10- मोरांगणा व 11- वाठोडा हे 2 निवडणूक विभाग व त्याअंतर्गत 19-काचनूर, 20-मोरांगणा, 21-देऊरवाडा, 22- वाठोडा या 4 निर्वाचक गणांची सार्वत्रिक निवडणूक दुसर्या टप्प्यात दिनांक 21 फेब्रुवारी, 2017 रोजी होणार असून त्या दिवशी संबधीत निवडणूक विभाग/निर्वाचक क्षेत्रात मतदानासाठी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम/अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी. सर्व दुकाने व आस्थापना निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते पालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले.