अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरात फॉरेंसिक सायन्स विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहे. सोबतच इतर ४ कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
वलसाडजवळील जुजवा गावात प्रधान मंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांच्या सामूहिक ‘ई-गृहप्रवेश’ कार्यक्रमाला मोदी जाणार आहेत. या योजनेंतर्गत गुजरातमध्ये १ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. त्यानंतर धरमपूर आणि कपराडा तालुक्यातील पाणी प्रकल्पाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे.
यानंतर मोदी सौराष्ट्रामधील जुनागढ येथील गुजरात मेडिकल अॅण्ड एज्युकेशन रिसर्च सोसायटीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सौराष्ट्रानंतर गांधीनगरच्या गुजरात फॉरेंसिक सायन्स विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्याला मोदी संबोधीत करणार आहेत.
जुलै महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोदींनी गुजरात दौरा पुढे ढकलला होता. आज मोदी सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या बैठकीलासुद्धा जाणार आहेत. या बैठकीला अमित शाह हजेरी लावण्याची शक्यता आहे.