नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार आहे. पण यावेळी ते कोणत्या विषयावर बोलणार आहेत यासंबंधी माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारने चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताचे सार्वभौमत्व, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयावर भाष्य करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी ‘मन की बात’मध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली असल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे पूर्व लडाखवरुन भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या लष्कर अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्यावरुन बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये १५ जून रोजी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं कौतुक केले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या मुद्द्यावर बोलतात याकडे विविध खात्याच्या मंत्र्यासह विरोधी पक्षाचे लक्ष लागून आहे.