नगरसेवकांचा ठेकेदाराला इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्यानांमध्ये सध्या खूप गर्दी आहे. मात्र थेरगाव बोटक्लब व तेथील उद्यानामध्ये अक्षरशः दुरवस्था आहे. झाडांना पाणी नाही. स्प्रिंकलर व दिवे बंद अवस्थेत आहेत. धबधबा सुरळीत नाही. उद्यानाची देखभाल नीट केली नाही. या उद्यानाची आणि बोटक्लबची देखभाल कऱण्याचा ठेका सनी वॅटर स्पोर्टस् सेंटर यांना 2016 मध्ये देण्यात आला आहे. मात्र करारानुसार काम सुरुळीत चालू नसल्याने बोटक्बलची दुर्दशा झाली आहे. आठवडाभरात करारानुसार ठेकेदाराने काम करून द्यावीत अन्यथा त्यांचे काम काढून घेतले जाईल अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. मात्र महापालिकाच सुविधा देत नसल्याने उद्यानाची दुर्दशा झाल्याचे सनी वॅटर स्पोर्टस या ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.
आयुक्तांची घेतली भेट
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी आणि नागरीकांसाठी एकमेव रम्य असलेले ठिकाण हे उद्यान, बोटक्लब आहे. मात्र उद्यानाची दुर्दशा झाली आहे. 2003 मध्ये या थेरगाव बोटक्लबची स्थापना करण्यात आली आहे. सुरुवातीला दुसर्या ठेकेदाराने या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे. तर 2016 मध्ये बोटक्लब आणि उद्यानाचे काम सनी वॉटर स्पोर्टस सेंटरला देण्यात आले आहे. मात्र महापालिकेने सनी सोबत करार केल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसर्या ठेकेदाराला काम दिले आहे. त्यामुळे या उद्यानाची दुर्दशा झाल्याचे महापालिका आणि नगरसेवकांचे म्हणणे आहे. थेरगाव बोटक्लब आणि उद्यानाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका झामाबाई बारणे, अॅड. सचिन भोसले, सिध्देश्वर बारणे, निलेश बारणे, माया बारणे यांनी महापालिकेच्या प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर यांची भेट घेतली होती. तसेच उद्यान विभागाचे मुख्य अधिक्षक सुरेश साळुंके यांनाही बोलावण्यात आले होते.
पत्रव्यवहार करूनही सुविधा नाहीत
यासंदर्भात सनी वॅटर स्पोर्टसचे संचालक सनी सबास्टीयन म्हणाले की, 2016 मध्ये थेरगाव बोटक्लब आणि उद्यानाच्या देखभालीचे काम घेतले आहे. काम सुरु करतानाच काही समस्या असल्याचे सांगितले होते. मात्र आधी काम सुरु करा मग सुविधा देऊ असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेने वीज, पाणी, मोटार पुरविले नाही. धबधब्याचा पाईप तुटल्याने पाणी व्यवस्थित नाही. पाण्याचे कनेक्शन जुने आहे. लाईटचे काम अपूर्ण, जंक्शन बोर्डचे काम अपुर्ण यासर्व गोष्टींचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. उद्यान आणि बोटक्लबमधील टॉयट्रेनचा करार आमच्यासोबत होणे अपेक्षित असताना झाला नाही. स्थानिकांनी विना परवानगीने हे सुरु केले आहे.
उद्यानाची दुर्दशा झाली
मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके म्हणाले की, थेरगाव उद्यान आणि बोटक्लब देखभालीसाठी सनी वॅटर स्पोर्टस या संस्थेला ठेका दिला होता. मात्र त्याने स्वतः या उद्यानाची देखभाल न करता दुसर्याला ते काम परस्पर दिले आहे. त्यामुळे गार्डनमधील झाडांना पाणी दिले जात नाही, लॅन खराब झाले आहे.100 स्प्रींकलर व विद्युत दिवे बंद आहेत. आमच्याकडून सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र एकापेक्षा अधिकांचा हस्तक्षेप असल्याने दुर्दशा झाली आहे.