पुणे : केरळमध्ये हजेरी लावलेल्या मोसमी पावसाची (मान्सून) जोरदार आगेकूच सुरु असून, मान्सूनने केरळसह उत्तर-पश्चिमी भाग व्यापला आहे. तर 7 जूनपर्यंत तो पुण्यात हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याच्यावतीने देण्यात आली. मध्य भारत व्यापण्यास 14 जूनपर्यंतचा कालावधी लागेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले. सद्या दमदार वाटचाल करत असलेल्या मान्सूनची हजेरी समाधानकारक असून, त्यामुळे बळिराजासह देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरीवर्ग मान्सूनची चातकासारखी प्रतीक्षा करत आहे. तथापि, नेहमीच्या वेळेला म्हणजेच 7 जूनला तो पुणे जिल्ह्यात हजेरी लावणार असल्याने शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळालेला आहे.
10 जूनपासून महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी
सद्या मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवर जोरदार धडक दिलेली आहे. त्याची अशीच वाटचाल सुरु राहिली तर मुंबई आणि पुण्यात तो 7 तारखेला पोहोचेल. दरवर्षी तो पुण्यात 8 जूनला व मुंबईत 10 जूनपर्यंत तो दाखल होत असतो. सरासरी 10 जूनपासून तो महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावत असतो. परंतु, यंदा तो एक-दोन दिवस अगोदरच महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचेल, अशी माहितीही हवामान खात्याच्यावतीने देण्यात आली. बांगलादेशाच्या समुद्री भागात मोरा नावाचे वादळ येऊन गेल्याने मान्सूनची गती वाढली आहे. तसेच, आर्द्रताही चांगली निर्माण झाली आहे. परिणामी, केरळ, तामिळनाडूसह उत्तर-पूर्व भागात चांगला पाऊस होत आहे, असेही हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले.