आठ वर्षांनी पिडीतेला मिळाला न्याय

0

जळगाव । धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे 8 वर्षापूर्वी एका महिलेच्या घरात घुसून व बेकायदेशिर मंडळी जमवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पिडित महिला व साक्षीदार यांना विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयातील न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता 29 पैकी 19 आरोपींना शिक्षा देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, 19 जुलै 2010 रोजी 32 वर्षीय पिडित महिला आणि साक्षीदार अनिल वसंत चौधरी यांनी पिडित महिलेच्या घरी शेती निमबटाई करण्यासंदर्भात रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान चर्चा सुरू असतांना 29 आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमा करत पिडित महिलेच्या वर्तनावर संशय घेत घरात प्रवेश करत महिला आणि साक्षीदार अनिल चौधरी यांना मारहाण करत अंगावरील कपडे काढत विवस्त्र केले होते. एवढेच नाही तर विवस्त्र करून पिडित महिला आणि साक्षीदार यांचे मोबाईल व कॅमेराद्वारे अश्‍लिल फोटो काढले होते.

याच्यावर होता गुन्हा 
पिडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी आबा उर्फ गजानन सोमनाथ कोळी, गोकुळ सुरेश कोळी, विकास अशोक कोळी, भरत प्रकाश कोळी, उखर्डु देवचंद कोळी, महेश मधुकर कोळी, मंगल हरी सुतार, विनोद नामदेव कोळी, रविंद्र नथ्थु कोळी, जिवन नेताजी कोळी, एकनाथ सोनु मोरे, कमलाकर बाळु कोळी, एकनाथ उर्फ छोटू रघुनाथ कोळी, समाधान नथ्थु कोळी, दगडु अभिमन मोळी, भटु रमेश कोळी, संजय शालिक कोळी, ईश्‍वर राजाराम कोळी, सुभाष भिका कोळी, नथ्थु पुंडलिक कोळी, भरत पुंडलिक कोळी, विजय नारायण पाटील, ज्ञानदेव नागो कोळी, बापू संतोष कोळी, युवराज राजाराम कोळी, नाना दादु कोळी यांच्यासह अन्य दोन जण असे एकूण 29 जणांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

19 जणांना शिक्षा

पिडित महिलेच्या फिर्यादीवरून झालेल्या 29 आरोपींपैकी आज झालेल्ेया न्यायालयीन कामकाजात 19 जणांना शिक्षा दिली. उर्वरीत आरोपींमध्ये आरोपी मंगल सुतार, एकनाथ मोरे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर समाधान कोळी, ईश्‍वर कोळी, नथ्थु कोळी आणि बापू कोळी हे चौघे मयत झाले आहेत. तर कमलाकर कोळी आणि भटु कोळी हे अल्पवयीन असल्याने निर्दोष सुटका केली आहे. यापैकी उर्वरित सर्व आरोपींना भादंवि कलम 143, 354, 504, 448, 506 आणि 442 अन्वये 6 ते 1 वर्षाची शिक्षा आणि पिडित महिला व साक्षीदार यांना नुकसान भरपाई म्हणून या दोघांना प्रत्येकी सर्व प्रत्येक आरोपींकडून 1000 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

18 जणांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
या गुन्ह्याच्या खटल्याप्रकरणी फिर्यादी पिडीत महिला, तिची 12 वर्षीय मुलगी, फिर्यादीचा पती, अनिल चौधरी, समाजसेविका अरुणा कंखरे, तपासधिकारी एपीआय चव्हाण, तत्कालीन पोलिस निरीक्षक योगीराज शेवगन, यांच्यासह एकूण 18 जणांच्या न्या. निलीमा पाटील यांच्या न्यायालयात साक्षी नोंदविण्यात आल्या. तर बचावपक्षातर्र्फे 3 साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आशा शर्मा व अ‍ॅड.अनिल बागले यांनी कामकाज पाहिले. त्यानुसार न्यायालयाने भादवी कलम 143 खाली सर्व संशयितांना 1 महिना शिक्षा, कलम 354 खाली सर्व संशयितांना 1 वर्ष शिक्षा, कलम 504 खाली 6 महिने शिक्षा, कलम 506 खाली 6 महिने शिक्षा, कलम 342 खाली 6 महिने शिक्षा, कलम 448 खाली 6 महिने शिक्षा सुनावली आहे. आणि न्यायालयाने पिडीत महिलेसह पुरुषांला प्रत्येक संशयिताने प्रत्येकी 1 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणजेच पिडीत महिलेला व पुरुषाला 19 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  • कोट
    ”दैनिक गावकरीमध्ये या घटनेची दखल घेतल्यानंतर संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी माझ्यावर दबाव टाकत बिहारी प्रथा आपल्या महाराष्ट्रात पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिडित महिलेला न्याय मिळावा हा मुख्य हेतू होता. मात्र मला मानसिक त्रास देत खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न महिला संघटनांमार्फत करण्यात आला होता. मात्र आज न्यायालयाने सर्व आरोपींना शिक्षा देऊन पिडित महिलेला न्याय दिला याचा मला आज आनंद आहे”.
    – विजय वाघमारे, प्रकरण उजेडात आणणारे पत्रकार