आरपीचा दावा; भाजपामध्ये बंडखोरी अटळ

0

पिंपरी चिंचवड (बापू जगदाळे) : चिंचवड व भोसरी मतदारसंघापेक्षा पिंपरी राखीव मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून काहींनी त्यासाठी शक्तिप्रदर्शनही सुरू केले आहे. यामध्ये भाजपा व आरपीआयमधील पदाधिकार्‍यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे दोन्ही पक्ष सत्तेतील अगदी जवळचे घटक पक्ष आहेत. असे असले तरीही या जागेवरील दावा आरपीआय कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे भाजपामधील इच्छुकांना बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नाही. ही बंडखोरी पुन्हा एकदा शिवसेनेच्या विजयास कारणीभूत ठरणार की राष्ट्रवादीच्या? हे या दोन्ही पक्षातील बंडखोरीवरच अवलंबून आहे. यासाठी शिवसेनेकडून पुन्हा विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीतून अमित मेश्राम किंवा अण्णा बनसोडे उमेदवार असतील. तर भाजपाकडून अमित गोरखे, सीमा सावळे, वेणू साबळे व आरपीआयकडून चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, अमित मेश्राम प्रमुख इच्छुक असणार आहेत. यातील कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल हे निकालनंतरच स्पष्ट होईल.

2009ला राष्ट्रवादी जिंकली
मागील निवडणुकीत राज्यात आरपीआय आठवले गटाने भाजपाबरोबर आघाडी करत विधानसभेच्या काही जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये शहरातील पिंपरी विधानसभेचा समावेश होतो. 2009 साली अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. त्यामध्ये अण्णा बनसोडे एकमेव राष्ट्रवादीच्या तिकीटावर शहरात निवडून आले होते. त्यांनी त्यावेळी भाजपाचे उमेदवार व आत्ताचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांचा सहा हजारापेक्षा जास्त मताने पराभव केला होता; पण साबळे यांनी दिलेली लढत ही भाजपाची ताकद दाखविणारी ठरली. कारण साबळे यांच्यावर बारामतीहुन आयात केलेला उमेदवार म्हणून जोरदार टीका झाली. तसेच त्यांना प्रचाराच्या तयारीसाठी देखील कमी अवधी मिळाला होता. तरीही त्यांनी शिवसेनेच्या साथीने दोन नंबरपर्यत मारलेली मजल लक्षवेधी ठरली. तर आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या तीन नंबरवर राहिल्या होत्या.

युती तुटली; सेनेच्या पथ्थावर
2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून देशाबरोबरच राज्यातील राजकीय समीकरण देखील बदलली. यामुळे लोकसभा एकत्रित लढलेल्या शिवसेना व भाजपाची तुटलेली युती व आरपीआयने भाजपाला दिलेली साथ यामुळे या मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ही जागा आरपीआयला सोडण्यात आली. तर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून आलेले गौतम चाबुकस्वार यांच्या रुपाने शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला होता. तर राष्ट्रवादीकडून पुन्हा अण्णा बनसोडे यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. आरपीआयकडूनही चंद्रकांता सोनकांबळे याच आमदारकीच्या उमेदवार होत्या. तर कॉग्रेसचा उमेदवार प्रभावहीन असल्यामुळे तिरंगी लढत होऊन शिवसेनेचे चाबुकस्वार दोन हजार मते घेऊन विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे बनसोडे विजयाच्या फाजिल आत्मविश्‍वासाला बळी पडून पराभुत झाले तर सोनकांबळे यांना चिन्हांचा फटका बसून पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र चाबुकस्वार यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमाणेच आमदारकीची मोठे पद मिळाले. पण हा सर्व झाला इतिहास.

सीमा सावळेंना मिळेल संधी?
आत्ताची परिस्थिती बघता महापालिकेवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असल्यामुळे या मतदारसंघातून भाजपामधील अनेक इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले आहे. यामध्ये आघाडीवर असलेले नाव म्हणजे, स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे. मागील वेळी शिवसेनेत असल्यापासून त्यांची पिंपरी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून झालेली हकालपट्टी त्यांना आमदार पदापासून वंचित ठेवून गेली. नाहीतर कदाचित चाबुकस्वार यांच्या जागी त्याच आज आमदार राहिल्या असत्या; पण त्यांना ही संधी यावेळेस मात्र कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही. यासाठी त्यांना भाजपाचे शहर अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची खंबीर साथ आहे. असे असले तरी जुन्या भाजपा बरोबरच त्यांना आरपीआयच्या विरोधाचा देखील सामना करावा लागणार आहे. कारण भाजपामधून अमित गोरखे यांनी देखील विधानसभेची तयारी सुरु केली आहे. तर खासदार साबळे हे देखील या मतदारसंघातून आपली कन्या वेणू साबळे हिला उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी वरिष्ठ स्तरातून आत्तापासूनच सेंटीग लावून असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे सावळे यांच्या उमेदवारीवरून नवा-जुना वाद पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.

आरपीआयमधून मेश्राम, ओव्हाळ यांना संधी
भाजपाचा घटकपक्ष असलेल्या आरपीआय पक्षाला मागील जागावाटपात पिंपरीची जागा वाट्याला आली होती. त्यावेळी सोनकांबळे यांनी दुसर्‍यांदा ही जागा लढवली होती; पण दोन्ही वेळेस त्या आपला प्रभाव पाडू शकल्या नाहीत. साहजिकच यावेळी भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले बाळासाहेब ओव्हाळ किंवा उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांना पक्षाकडून संधी दिली जाऊ शकते. नुकताच ओव्हाळ यांनी आपला वाढदिवस साजरा करत विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. तर मेश्राम छुप्या पध्दतीने आपला प्रचार करत आहेत. पण काहीही झालेतरी ही जागा आरपीआय भाजपाला सोडणार नसल्याने आरपीआयचा उमेदवार येथून निश्‍चित असल्याने येथून भाजपा बरोबरच आरपीआयचा देखील उमेदवार मैदानात असणार आहे. हे मात्र नक्की.