माजी महसूलमंत्री मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यास यश
मुक्ताईनगर- आणिबाणी लागू असतांना 1975 ते 1977 च्या दरम्यान ज्या कार्यकर्त्यांना लोकांना मिसा बंदी कायद्या अंतर्गत कारागृहात बंदी केले होते अश्या महाराष्ट्र राज्यातील मिसा बंदींना मानधन देण्यास साठी पुरवणी मागण्यामध्ये केलेल्या 42 कोटी रुपयांपैकी 12 जिल्ह्यांसाठी पाच कोटी 86 लाख 40 हजार रुपयांच्या वितरणाचा आदेश 28 जानेवारी रोजी शासनाने नुकताच काढला. यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी विधानमंडळात आवाज उठवत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.
या जिल्ह्यातील मिसा बंदींना होणार लाभ
नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार जळगाव, वर्धा, नाशिक, सिंधुदुर्ग, गोंदिया, नंदुरबार, भंडारा, रायगड, लातूर, हिंगोली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातील मिसा बंदींना या निर्णयाचा लाभ होणार आहे.त्यामध्ये 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावास भोगावा लागलेल्यांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कारागृहात असलेल्यांना पाच हजार रुपये मासिक मानधन मिळेल. दरम्यान, एक महिन्याहून अधिक काळ बंदी असलेल्या व्यक्ती हयात नसल्यास त्यांच्या पत्नीस, पतीस मासिक पाच हजार रुपये मानधन मिळेल तर एक महिन्याहून कमी कालावधी करीता मिसा बंदी असलेल्यांच्या पत्नीस व पतीस मासिक दोन हजार 500 रुपये मानधन मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात 84 बंदीजणांना होणार लाभ
जळगाव जिल्ह्यात एक महिन्यापेक्षा अधिक कारावास भोगलेल्या एकूण 49 जणांना आणि 15 बंदीजनांच्या वारसांना तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या 19 बंदिजणांना आणि एका बंदिजणाच्या वारसाला असे एकूण 84 बंदीजणांना याचा लाभ होणार आहे.