…आणि खुद्द नागरी उड्डाण मंत्र्यालाच प्रवासात नाश्ता देणे नाकारले

0

नवी दिल्ली: केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. जयंत सिन्हा यांनी काल दिल्लीहून रांचीला जात होते. त्यावेळी त्यांनी एअर एशियाच्या विमानातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान जयंत सिन्हा यांनी नाश्ता ऑर्डर केला होता. मात्र विमानातील कर्मचाऱ्याने त्यांना नकार दिला. यानंतरही सिन्हा अतिशय शांत होते. विमानात घडलेला हा किस्सा सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने ट्विटरवर शेअर केला आहे.

जयंत सिन्हा यांनी तिकीट आरक्षित करताना दक्षिण भारतीय जेवण ऑर्डर केले होते. त्यामध्ये नाश्त्याचा समावेश होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला नाश्ता हवा असल्यास त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील, असे कर्मचाऱ्याने नम्रपणे सिन्हा यांना सांगितले. यानंतर सिन्हा यांनी कोणताही बडेजाव न दाखवता अतिशय शांतपणे नाश्त्याचे पैसे कर्मचाऱ्याला दिले.

असद राशिद असे जयंत सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाश्याचे नाव आहे. अनेकांनी सिन्हा यांच्या शांत आणि संयमीपणाचं कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री असूनही त्याचा कोणताही अहंकार न बाळगणाऱ्या सिन्हा यांच्यावर खूप जणांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. विशेष म्हणजे राशिद यांचं ट्विट जयंत सिन्हा यांनी रिट्विट केलं आहे. यासोबत सिन्हा यांनी एक स्माईली वापरला आहे. सिन्हा यांच्याकडून इतर राजकारण्यांनी धडे घ्यावेत, असा सल्ला अनेकांनी राशिद यांचं ट्विट रिट्विट करताना दिला आहे.