चाळीसगाव- राज्यात सुरु असलेल्या व सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव ठरलेला सीएम चषक स्पर्धेत चाळीसगाव तालुक्याची टॉप टेनकडे वाटचाल सुरू असून आज झालेल्या स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेचे आमदार उन्मेष पाटील यांनी समालोचन करीत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. आज जवळपास दीड ते दोन हजार कुस्तीपटूंची नोंदणी झाली. शहरातील हिरापुर रोड वरील नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य एस.आर.जाधव व जेष्ठ क्रीडा शिक्षक एम.आय.चव्हाण यांच्या हस्ते आखाडा पूजन करून कुस्ती स्पर्धा सुरू झाली.
या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली असल्याने चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्या कुस्ती विजेत्या स्पर्धकाला आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते समई व मुख्यमंत्री यांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात आले. आजच्या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक मुलींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी तालुका समन्वयक सचिन पवार, पंच क्रीडा शिक्षक अजय देशमुख, पंचायत समितीचे सदस्य भाऊसाहेब पाटील, कुस्तीपटू बंडू पगार , अनिल चव्हाण, पप्पू राजपूत, सारंग जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.