आता एकच टार्गेट… सिव्हील हॉस्पीटल !

0

जिल्हा रूग्णालयातील अस्वच्छतेवरून जिल्हाधिकार्‍यांकडुन अधिकार्‍यांची झाडाझडती

जळगाव : ग्रामीण भागातुन येणार्‍या गोरगरीब रूग्णांसाठी शासनाने तयार केलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयच अस्वच्छतेचे माहेरघर झाले आहे. या अस्वच्छतेच्या विषयावरून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज थेट जिल्हा रूग्णालयात जाऊन अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. रूग्णालयातील स्वच्छता करण्यास आठ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी आज दुपारी अचानक जिल्हा रूग्णालयात पाहणी केली. जिल्हाधिकारी येणार म्हणून जिल्हा रुग्णालयातील आतील परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी सर्व तयार झाली. मात्र जिल्हाधिकारी रुग्णालयाच्या आत गेले नाही. रुग्णालयाच्या परिसराची पाहणीसाठी अचानक गेले. तेथे त्यांना अनेक ठिकाणी कचरा साठलेला दिसला, अनेक ठिकाणी कचरा अर्धवट जळत असलेला दिसला, गटारी तुंबलेल्या, अनेक ठिकाणी पाणी साचलेले, गवत वाढलेले, रुग्णालयातील वेस्टेज उघड्यावर पडलेले दिसले. हे सर्व पाहून अतिशय किळस वाटली. त्यांनी संबंधित जबाबदार अधिकार्‍यांना बोलावून चांगलेच फैलावर घेतले.

प्रशासकीय अधिकारी आवश्यक

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले, की जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आज पाहणीत अस्वच्छता आढळून आली. जे सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक आहे. संबंधितांना आठ दिवसांचा अवधी देवून स्वच्छता करण्यास सांगितले आहे. रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी सक्षम हवा. त्यांनी याबाबींवर लक्ष ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे काम करण्याची इच्छा मनापासून पाहिजे. प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पाळली तर अडचण येत नाही.

पाच मजली इमारत बांधणार

जिल्हा रुग्णालयाची जागा 12 एकर आहे. दहा लाख स्व्केअर फूट जागा बांधकाम होईल एवढी जागा आहे. रुग्णालय बांधताना नियोजन योग्य पद्धतीने केलेले नाही. एवढ्याच जागेत पाच मजली रुग्णालयात इमारत बांधून सुसज्ज रुग्णालय करता येईल. त्यासाठी काही इमारती पाडण्याचे नियोजन करीत आहे.

अधिकारी निरूत्तर

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिकारी, विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. संबंधित जबाबदार अधिकार्‍याला बोलावून जिल्हाधिकार्‍यांनीच घाणीचे साम्राज्य अधिकार्‍यांना दाखविले. काय काम करता, स्वच्छतेबाबत एवढे आपण निष्काळजी कसे राहू शकतो ? घरीतरी आपण अस्वच्छता ठेवतो का ? आदी प्रश्न विचारून अधिकार्‍यांना निरूत्तर केले.

रॅम्पच्या उंचीवरून अभियंत्यांचे काढले बौध्दीक दिवाळे

दिव्यांगाना रुग्णालयात येण्यासाठी रॅम्पची व्यवस्था असते. मात्र उंची अधिक असल्याची बाब पाहणीत जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच संबंधित काम करणार्‍यास रॅम्पची उंची किती असावी हे विचारले, इतर अधिकार्‍यांनाही विचारले. मात्र त्यांना योग्य उत्तरे देता आली नाही. जिल्हाधिकार्‍यांनी योग्य उत्तर देवून काम किती बोगस असल्याचे
दाखवून दिले.

रूग्णालय आता टार्गेट

जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता पाहून डोके दुखू लागले आहे. रुग्णालयाच्या आतील व बाहेरील अस्वच्छता दूर करून रुग्णालय स्वच्छतेसाठी नंबर वन बनविण्याचा माझा संकल्प आहे. त्यासाठी नियोजन केले जाईल. आता जिल्हा रूग्णालय हेच एकमेव टार्गेट असल्याचे त्यांनी सांगितले.