गर्दीची, कंपूची भीती आधी वाटत नव्हती. आता आता वाटू लागली आहे. कधी नव्हे इतकी तीव्रतेने ती भयानक वाटत आहे. गर्दीपासून लांब पळून सुद्धा भीती कमी होईना. भीतीची भीती वाटावी इतकं भय मनात साचून राहीलंय. हे सांगताना मी घाबरलेलो आहे. याची लाज तरी का बाळगावी बरं मी? मर्द असून घाबरतोस अशा वाक्याचा भाडीमार होईल म्हणून मी शांत बसून राहीलो तर वरकरणी शांत राहून आतून युद्धाला सामोरं जात राहील. ते युद्ध आतल्याआतच इतकं घायाळ करून सोडेल की, भेदरलेल्या चेहर्यानं, गप्प ओठांनी मी कायमचा शांततेच्या अधीन होईन. इतक्या सहजपणे की कदाचित माझ्या किंकाळ्यांचा आवाज मला सुद्धा ऐकू येणार नाही. ही स्थिती किंवा ह्या स्थितीच्या शक्यतेत मी फक्त स्वतःला एकट्याला पाहतोय का? तर नाही. कमी अधिक फरकाने दहातल्या सातांची ही स्थिती झालेली पाहतो आहे. दिसते आहे. खाजगीत ऐकतो आहे. खाजगीत ऐकवणार्यांची गर्दीच आता आजूबाजूला जमा होऊ लागली आहे. या गर्दीची सुद्धा भीती वाटू लागली आहे.
घाबरवणार्यांची गर्दी आणि घाबरलेल्यांची गर्दी. त्यात मेलेल्यांची गर्दी अदृश्य आहे. त्यांची मयतं कुठेतरी पुरली जातायेत. जाळली जातायेत. काही जीवंत पुतळे बनून अज्ञातवासात आहेत तर काही तुरूंगात आहे. तुम्ही घाबराल तर जीवंत रहाल. निडर बनाल तर कमी अधिक फरकाने मृत्यूच्या अधीन व्हाल. तो खुन असणार नाही. तो वध असेल. त्याला अप्रत्यक्ष कायदेशीर मान्यता असेल. असेल नव्हे तर आहेच. ती मूक संमतीने आता मिळू पाहते आहे. कालांतराने दोन्हीकडच्या गर्दींच्या सोयीचे हे बनेल. कॅनिबल्सच्या बीजांचं रोपण झालेल्या कालखंडात माती उखडायचे विसरलेले घाबरट, निर्बुद्ध नी अज्ञानी लोकच मग त्या रोपांचं डेरेदार खोड बनल्यावर घटपर्णी ओढतात किड्या मुंग्यांना तसे अलगद आत ओढले जातील. तेव्हा त्यांचा आवाज सुद्धा ऐकू येणार नाही. ते काय बोलतायेत याचा साधा लवलेश सुद्धा राहणार नाही. ज्यांना आतून वाटतंय की काहीतरी चुकलं आपलंच, आपण वेळ असतानाच बोलायला हवं होतं, डोळे फिरवायला नको होते, कान बंद करायला नको होते पण उशीर झालेला असेल. गर्दीला अक्कल नसते. पण गर्दीला वृत्ती असते. ती वृत्ती समुहाच्या वर्चस्वाची असते. समुह मग तो कोणताही असो. समुह जेव्हा वर्चस्व मागतो तेव्हा सर्व प्रकारच्या समतेच्या तत्वांना हरताळ फासण्यासाठी कराव्या लागणार्या निर्मम हिंसक कृत्यांसाठी मानवी मेंदू मानवाला खुली सुट देत असतो. गर्दी खोटं बोलते, गर्दी खोटंच ऐकते, तीला खोटं बोललेलं आवडतं. ती त्यावर सुखावते. तो गर्दीचा ऑर्गी असतो. गर्दीच्या या ऑर्गेझमला शमवणारा नायक हा खोट्याचा सरताज असतो. मग तो कुणीही असू शकतो. समाजवादीही, आंबेडकरवादीही, मार्क्सवादीही. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कुणीही असू शकतो.
गर्दीला घाबरणारे म्हणूनच शांत असतात. ते बोलत नाही. ते इतरांना बोलतं करण्याचा प्रयत्न देखील करत नाही. स्वतः निमुट सहन करतात. इतरांनाही सहन करायला भाग पाडतात. आम्ही वेगळे आहोत असं म्हणून पृथःकरण करणर्यांची गर्दी सुद्धा तितकीच भयानक असते. कारण ते पब्लिकली ओपन असलेल्या पॉलिटीकल अॅड्रेसिंगला टाळत असतात. त्यांचं टाळणं हेच त्यांच्या पराभूतपणाचं कवच त्यांची सुरक्षा करत असतं. असल्या पराभूत मानसिकता मग अस्मितेच्या मुद्द्यांसाठी खतपाणी घालत राहतात. अस्मितेचे मुद्दे आले गर्दी विसरते अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी, उपलब्ध साधनांचं समान वाटप. त्यातून बळकट होतात जातींच्या भींती. ह्या भींतीच भीतीला गडद करत जातात. जातीचे मोर्चे उभे राहतात. त्यांना आक्राळ विक्राळ रुप दिलं जातं. समोर अदृश्य शत्रु निर्माण केला जातो. तो शत्रु मुळात अस्तित्वातच नसतो. तरी त्याची भीती समुहाला, गर्दीला दाखवली जाते. मग बेअक्कल शरिरात वर्चस्वाची वृत्ती संचारली की त्याला रक्ताची चटक लागते. ही चटक फक्त त्याच लोकांना लागते ज्यांना प्रत्येक प्रश्नांची सोपी उत्तरे शोधण्याची सवय लागलेली असते. भारतात अशा सोप्या उत्तरे शोधणार्या लोकांनीच शिवसेना वाढवली, बजरंग दल पोसली की, काँग्रेसच्या विरोधात मतदान करताना भाजपला पर्याय निवडून सर्वात मोठी चूक केली ? मी कोणाचाही पक्षकार नाही. मी भीतीच्या पक्षाविरोधात उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. भीतीला हरवण्याचा प्रयत्न करतो आहे. भीती हरली तर गर्दी दर्दी बनेल. माझे आप्त- प्रेमाची माणसं रोज गर्दीचा भाग बनतात. त्यांचा पक्ष अजून ठरलेला नाही. पण जरा काही झालं की ते एक तर निडर बनतात नाहीतर घाबरट तरी. शोषण दोन्ही प्रकारांत मोडतं. आई काम करते त्या ठिकाणी हजारोंची गर्दी असते. त्या गर्दीशी तीला डिल करावं लागतं. तीच्यासाठी भीती वाटत राहते. ट्रेनमधून, बसमधून प्रवास करताना भीती वाटते. हातात घेतलेल्या काळ्या पिशवीत सॅनिटरी नॅपकिनच आहे. मटन नाही. हे लोकांनी लक्षात न घेताच मारलं तर या भीतीने जगणार्यांसाठी आता घाबरावं लागत आहे. घाबरणं तर अजून बरंच काही आहे. पण तुम्ही लक्षात घेताय का … या भीतीनं तणावात जगणार्यांची तादाद वाढते आहे. हा तणाव वाढत चाललाये. फुटण्याच्या दिशेने पळत चाललाय. तो फुटला तर काय होईल ठाऊक नाही. आज देशद्रोही म्हणून मारलो जाईल. तर उद्या सत्ता पालटलीच तर नक्षलवादी म्हणून. मरण चुकलेलं नाही. सार्या जमाखर्चाच्या हिशोबात मरण शाश्वत असल्याची, मरणानंतर जग नसल्याने, नसलेल्या जगात भीतीचा, गर्दीचा लवलेश नसल्याची खात्री हाच काय तो सुखाचा बिंदू.
– वैभव छाया