ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध हा देशाच्या इतिहासातील सर्वात कोलाहलयुक्त कालखंडापैकी एक मानावा लागेल. वास्तविक पाहता जनता सरकारच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला निवडणुकीत धुळीस मिळवता येत असल्याचा आत्मविश्वास विरोधकांना आधीच आला होता. मात्र, इंदिराजींचे जोरदार पुनरागमन आणि त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष अक्षरश: भुईसपाट झाले होते. आणीबाणीच्या दमनपर्वात काँग्रेसविरुद्ध उभे ठाकलेल्यांमधील जनसंघाचे तोवर भारतीय जनता पक्षात परिवर्तन झाले होते, तर समाजवादी विचारधारेची मंडळी राजीव सरकारमधून बाहेर पडून भ्रष्टाचारविरुद्ध नारा बुलंद करणारे विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकवटली होती. संसदेत अवघे दोन सदस्य असणार्या भाजपला तत्कालीन घडामोडींमधून प्रखर हिंदुत्वाच्या माध्यमातून एक ज्वलंत मुद्दा मिळाला, तर व्हीपींच्या नेतृत्वाखालील मंडळीने सामाजिक न्यायाची हाक दिली. राम मंदिर, आरक्षण, समान नागरी कायदा, कलम-370 आदींवरून धुमसणार्या वातावरणात दिल्लीत सत्तारूढ झालेल्या व्हीपी सरकारने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या निर्णयाने देशाच्या राजकारणावर व्यापक परिणाम झाला. येथेच देशाच्या राजकारणात ‘मंडल विरुद्ध कमंडल’, असा संघर्ष उभा राहिला. हा संघर्ष वैचारिकदृष्ट्या पुरोगामी विरुद्ध सनातनी असा दर्शवण्यात आला असला, तरी याचा मूळ हेतू सत्ताकारणाच्याच भोवती फिरणारा असल्याचे काळाने सिद्ध केले. मंडलच्या गोटातील मुलायम, लालू, नितीश, शरद यादव आदींसारख्या मातब्बर मंडळीचे नशीब फळफळले, तर कमंडलच्या छावणीला दिल्लीच्या तख्तावर आरूढ होण्याची संधी मिळाली. मात्र, सत्तेसाठी कमंडल हाती घेणार्या भाजपने चतुराईने ‘मंडल’ची ताकद ओळखून विविध राज्यांमध्ये बहुजन नेत्यांना समोर आणण्याची रणनीती आखली. ठिकठिकाणांहून अनेक ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक समोर आणले गेले. याचीच परिणती 2014च्या निवडणुकीत मोदींच्या रूपाने राष्ट्रीय राजकारणात ओबीसी चेहरा समोर आणण्यात झाला. म्हणजे पाव शतकातच कमंडलने मंडलचा विचार वरकरणी तरी आत्मसात करण्याचा प्रकार केला. आता नेमक्याच याच पद्धतीने मंडल विचारधारेचे कट्टर पुरस्कर्ते असणारे मुलायमसिंग यादव यांनी कमंडल हाती धरण्याचा प्रयत्न करत जय श्रीकृष्णचा जयघोष सुरू केला आहे.
मुलायमसिंग यादव यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात राम हे केवळ उत्तर भारतात तर कृष्ण हे संपूर्ण देशात पूजनीय असल्याचे वक्तव्य केले. मुळातच मुलायम हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. त्यांच्या या वक्तव्याला राजकीय कंगोरे आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीने भारतीय राजकारणात एक विभाजन रेषा ओढली आहे. आजवर व्होट बँक ही फक्त अल्पसंख्याकांचीच असते, असे गृहीत धरणार्या राजकीय क्षेत्राला या निवडणुकीत हिंदू मतपेढीने जोरदार हादरा दिला. याचाच परिणाम म्हणून देशाच्या राजकारणात सुमारे तीन दशकांनंतर एक वैचारिक स्थित्यंतर होऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे राहुल गांधी यांनी गुजरातसह देशभरातील मंदिरात दर्शन घेण्याचा सपाटा लावला आहे. काँग्रेसचे भावी अध्यक्ष भाळी टिळा आणि जोडलेल्या हातांनी परमेश्वरी आशीर्वाद घेत आहेत. काही वर्षांपूर्वी याची कुणी कल्पनादेखील करू शकत नव्हते. मात्र, आता सत्तेचा मार्ग हा (नर्म का होईना!) हिंदुत्वाच्या रस्त्यावरूनच जाणार असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले आहे, तर प्रखर मंडलवादी मुलायमसिंग आणि त्यांच्या कुटुंबालाही आता श्रीकृष्णाची आवश्यकता भासत असल्याची बाब लक्षणीय आहे. याची तयारीदेखील सुरू झाली आहे. अखिलेश यादव यांनी सैफई या उत्तर प्रदेशातील गावात भगवान श्रीकृष्ण यांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम सुरू केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी मुलायम, लालू आदींसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. येथेच भाजपच्या जय श्रीरामच्या घोषणेला जय श्रीकृष्णच्या जयघोषाने प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच मंडल विरुद्ध कमंडलच्या तुंबळ लढाईला जन्म देणार्या उत्तर प्रदेशातच नवीन चित्तथरारक सामना रंगणार आहे. यात समाजवाद्यांच्या मुखात श्रीकृष्णाचा जयघोष तर भाजपच्या गोटात मंडलच्या सामाजिक न्यायाची भाषा असेल. मुलायमसारखी मंडळी श्रीकृष्णाची महती विशद करतील, तर भाजपची थिंक टँक नरेंद्र मोदी आणि रामनाथ कोविंद यांच्यासारख्यांच्या माध्यमातून आपण सर्व समाजघटकांना कसा न्याय दिला? याचे गोडवे गातील. अर्थात यातूनच भारतीय राजकारणात तीन दशकांनंतर एक मोठे स्थित्यंतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतीकांची पळवापळवी करण्यात भारतीय जनता पक्षाचे कौशल्य हे कुणापासून लपून राहिलेले नाही. काँग्रेस पक्षात सरदार पटेल आणि लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या नेत्यांवर कसा अन्याय झाला? हे सातत्याने अधोरेखित करत भाजपने सातत्याने गांधी घराण्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगण्याची चढाओढही आता सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी हे वैश्विक व्यासपीठावर सातत्याने बुद्ध आणि गांधी यांची महती व्यक्त करत असतात. या पार्श्वभूमीवर, नेमक्याच याच पद्धतीने भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला उत्तर देण्याची तयारी मुलायमसिंग यांनी सुरू केली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा तिढा सुटलेला नसताना यादव यांच्या मुखातील जय श्रीकृष्णचा जप हा भारतीय राजकारणातील प्रतीकांची लढाई आता एका नवीन पातळीवर खरं तर नव्या मैदानात लढली जाणार असल्याचे दर्शवणारी आहे. विशेष बाब म्हणजे यानंतर मुलायम यांनी ‘अयोध्येतील कारसेवकांवर अजून गोळ्या चालवाव्या लागल्या असत्या, तर आपण कचरलो नसतो!’ असे वक्तव्य करून आधीच्या विधानाला पुष्टी दिली आहे. प्रभू रामचंद्राच्या कृपेने भाजपला मिळालेले यश आपल्यासमोर आहेच. आता भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मुलायम आणि त्यांच्या पक्षाला कितपत लाभदायी ठरणार? याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.