आता ‘जीएसटी’च्या नावानेही ऑनलाईन फसवणूक!

0

पिंपरी-चिंचवड : आतापर्यंत एटीएम कार्डची गोपनीय माहिती विचारून किंवा ऑनलाईन शॉपिंगचे आमिष दाखवून अनेकांना भामट्यांनी फसवल्याचे ऐकण्यात आले होते. मात्र, ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे आता नवीन शक्कल लढवत आहेत. केंद्र सरकारने 1 जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही नवीन कर प्रणाली लागू केली. ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे आता लोकांना जीएसटीच्या अपडेशनच्या नावाखाली गंडा घालत आहेत. भोसरीत असाच प्रकार नुकताच समोर आला आहे. वैशाली कदम (वय 27, रा. केशवनगर, कासारवाडी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. अज्ञात भामट्याने त्यांना 74 हजार रुपयांत गंडविले असून, याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्‍वास ठेवणे पडले महागात
अज्ञात मोबाईलधारकाने वैशाली कदम यांच्या मोबाईलवर फोन करून जीएसटीचे अपडेशन करायचे आहे. त्यासाठी तुमच्या बँकेच्या एटीएम कार्डचा व पॅनकार्डचा गोपनीय सांकेतांक (पासवर्ड) हवा आहे, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन कदम यांनी सर्व माहिती सांगितली. त्यानंतर त्या भामट्याने कदम यांच्या खात्यावरून ऑनलाईन पद्धतीने चक्क 73 हजार 984 रुपयांची खरेदी केली. हा प्रकार समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याने कदम यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फसव्या कॉलला बळी पडू नये
जीएसटीची नोंदणी व अपडेशनसाठी करदात्याची गोपनीय माहिती आवश्यक नाही, असे स्पष्टीकरण जीएसटीचे पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांनी दिले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, करदात्यांनी अशा फोन कॉल व ई-मेलला बळी पडू नये. जीएसटी नोंदणी किंवा अपडेशन फोनद्वारे होत नाही. त्यासाठी करदात्याला आमच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या नोंदणीसाठी फक्त करदात्याचे नाव, त्याचा पत्ता व पॅन क्रमांक घेतला जातो. त्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक किंवा बँक खाते विचारले जात नाही. एवढेच नाही तर तुमच्या पॅन कार्डची माहितीही आम्ही परस्पर तपासतो. त्यासाठीही आम्ही करदात्यांना त्रास देत नाही. त्यामुळे तुम्हाला असा गोपनीय माहिती मागणारा फोन किंवा ई-मेल आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन मानकोसकर यांनी केले.