निगडी ते पुणे स्टेशन-स्वारगेट असा राहील बसचा मार्ग
निगडी : मध्यरात्री बारानंतर पुण्यात जाण्याची वेळ आली तर कसे जायचे? असा प्रश्न पडला तर चिंता करू नका. कारण आता पुण्याच्या रस्त्यांवरून धावणारी रातराणीची बससेवा आता पिंपरी-चिंचवडमधूनही सुरू होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून निगडी येथून पुणे स्टेशन, स्वारगेट या मार्गांवर नव्याने सुरू होणारी रातराणी बस धावणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर पुण्यात जायचे असेल किंवा पुण्यातून पिंपरी-चिंचवडला यायचे असेल तर नागरिकांना सोयीचे होणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांना हे नवीन वर्षाचे गिफ्ट असणार आहे. ही रातराणी बससेवा 1 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या मार्गांवरून धावणार रातराणी बस
पिंपरी-चिंचवड शहरातून सुरू होणारी रातराणी बस ही पुणे स्टेशन-निगडी (औंध मार्गे), पुणे स्टेशन-एनडीए गेट, स्वारगेट- निगडी (बाजीराव रोड- मुंबई, पुणे रस्त्यामार्गे), स्वारगेट- धायरी, पुणे स्टेशन-वाघोली या मार्गांवरून धावणार आहे. ही बससेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रात्री बारा वाजेनंतर सकाळी सहा वाजेपर्यंत ही बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. यासाठी एकूण 9 मार्गांवर 18 बस धावतील; ज्यांच्या एकूण 100 फेर्या होणे अपेक्षित आहे.
नागरिकांचे प्रवासभाडे वाचणार
रात्रीच्या वेळी रिक्षाला 500 रुपये देण्यापेक्षा सुरक्षित व अवघ्या 30 रुपयात प्रवाशांना पीएमपीएमएलची बस शहराच्या कानाकोपर्यात पोहोचवत असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, म्हणून आम्ही निगडी मार्गावरही रातराणी बस सुरू करत असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने सांगितले. या आधी साधारण दहा वर्षांपासून स्वारगेट-हडपसर, पुणे स्टेशन- हडपसर, कात्रज- शिवाजीनगर, कात्रज- पुणे स्टेशन या मार्गांवर रात्र बससेवा सुरू आहे. नव्या आणि जुन्या रात्र बससेवेमधून पीएमपीएमएलला दररोज एक लाख रुपयांचे म्हणजे वर्षाला सुमारे चार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे पीएमपीचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.
पाच रुपयांचे जादा शुल्क
रातराणीच्या बससेवेसाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा फक्त पाच रुपये जादा शुल्क असेल, असे प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याची घोषणा करताना स्पष्ट केले. या सेवेमुळे पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट या शहराच्या मुख्य भागात रात्रीच्या वेळी पोहोचणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा या रातराणीलाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी व्यक्त केला.