माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नागरी सत्कार प्रसंगी मांडली व्यथा
गणेश वाघ, मुक्ताईनगर । गेल्या 28 महिन्याच्या काळात नाथाभाऊंवर विविध प्रकारचे आरोप झाले, त्याच्या खोलवर चौकशा झाल्या, मात्र त्यातून निष्पन्न काही झाले नाही मात्र मी देशभरात बदनाम मात्र झालो. सरकारने विविध चौकशींचा ससेमिरा मागे लावला. आता सर्व आरोपातून निर्दोष मुक्त झाल्याने सरकारची आता मी निर्दोष आहे हे सांगण्याची जबाबदारी आहे. मात्र तसे होत नसल्याने वाढदिवसाच्या दिवशी राज्यभरातील सर्व जिल्ह्यात जाऊन जनतेपुढे मी चुकलो कुठे? याबाबत विचारणा करणार असल्याचे भावनाविवश उद्गार राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे काढले. 62 व्या वाढदिवसानिमित्त खडसे यांचा श्रीक्षेत्र कोथळी येथे नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
चुक सांगा राजकारण सोडतो
खडसे म्हणाले की, मी जर कुठे चुकलेलो असेल तर सरकारने मला ते सांगावे. आपण जनतेची माफी मागू. केवळ माझी चूक सांगा. याक्षणी मी माझे राजकारण सोडतो असे खडसे यांनी सांगत पक्षासाठी 40 वर्षे खर्ची घातल्याचे सांगून आपण पक्षात आयाराम नाही की लगेच मंत्रीपद घेतले. संघर्षातून ते मिळविले आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात भाजपाने जी सत्ता मिळविली आहे त्यात माझादेखील खारीचा वाटा असल्याचे ते म्हणाले. सत्यू स्वीकारा, चुकले असेल तर पोटात घाला असे उपरोधित टोलाही त्यांनी लगावला.
यांची होती उपस्थिती
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा.रक्षा खडसे, मध्यप्रदेशचे खासदार नंदकुमार चव्हाण, आ.संजय सावकारे, आ.हरीभाऊ जावळे, आ.उदेसिंग पाडवी, अमळनेरचे आ.शिरीष चौधरी यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.