आता न्यायासाठी यापुढे राज्यभरात एल्गार

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ; नागरी सत्कार प्रसंगी सुनावले खडे बोल

मुक्ताईनगर- गेल्या 28 महिन्यांच्या काळात नाथाभाऊंवर विविध प्रकारचे आरोप झाले, त्याच्या खोलवर चौकशा झाल्या मात्र त्यातून निष्पन्न काही झाले नाही मात्र मी देशभरात बदनाम मात्र झालो. सरकारने विविध चौकशींचा ससेमिरा मागे लावला. आता सर्व आरोपातून मी निर्दोष मुक्त झाल्याने सरकारची आता मी निर्दोष आहे हे सांगण्याची जबाबदारी आहे मात्र तसे होत नसल्याने वाढदिवसाच्या दिवशी मी संकल्प केला असून राज्यभरातील सर्व जिल्ह्यात जाऊन जनतेपुढे मी चुकलो कुठे? याबाबत विचारणा करणार असल्याचे भावनाविवश उद्गार राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे काढले. 66 व्या वाढदिवसानिमित्त खडसे यांचा रविवारी दुपारी श्री क्षेत्र कोथळी येथे नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, रविवारी दुपारी खडसे यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत राज्यातील अल्पसंख्यांक बांधवांसाठी पहिलेच असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयाचेही सालबर्डी येथे भूमिपूजन व कोनशीलेचे अनावरण करण्यात आले.

चूक सांगा राजकारण सोडतो
खडसे म्हणाले की, मी जर कुठे चुकलेलो असेल तर सरकारने मला ते सांगावे. आपण जनतेची माफी मागू. केवळ माझी चूक सांगा, या क्षणी मी माझे राजकारण सोडतो, असे खडसे यांनी सांगत पक्षासाठी 40 वर्षे खर्ची घातल्याचे सांगून आपण पक्षात आयाराम नाही की लगेच मंत्रीपद घेतले. संघर्षातून ते मिळविले आहे, असेही सांगण्यास ते विसरले नाही. राज्यात भाजपाने जी सत्ता मिळविली आहे त्यात माझादेखील खारीचा वाटा असल्याचे ते म्हणाले. मी जर सत्य बोललो असेल तर ते स्वीकारा, चुकले असेल तर पोटात घाला, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, महानंदाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, मध्यप्रदेशचे खासदार नंदकुमार चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार उदेसिंग पाडवी, अमळनेरचे आमदरर शिरीष चौधरी, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, मुक्ताईनगरच्या नजमा तडवी यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

भाजपात अन्याय नाही ; महसूलमंत्र्यांनी घातली फुंकर
भाजपा हा अन्याय करणारा पक्ष नाही, आज ना उद्या खडसेंना न्याय मिळेल, अशी बचावात्मक भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडत वेळ मारून नेली. लवकरच आनंददायी घटना घडेल, असा आशावाद आपण मुक्ताईचरणी व्यक्त करून त्यांनी खडसेंच्या मंत्री मंडळात पुर्नआगमन प्रश्‍नी बोलण्याचे टाळण्याचे.