आता पुणे-मुंबई प्रवास दीड तासांत

0

पुणे । रेल्वेच्या हायस्पीड कॉरीडॉर मध्ये पुणे- मुंबई मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे अतंर आता अवघ्या दिड तासात पुर्ण करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून देशभरात दहा हजार किलोमीटरचे नवीन ’हायस्पीड कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहेत. येत्या एप्रिलपर्यंत या मार्गांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून देशात सर्वात पहिल्यांदा पुणे-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली होता. मात्र बुलेट ट्रेन प्रकल्पातून पुणे-मुंबई मार्ग वगळला आहे. त्यामुळे आता हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली आहे. या अंतर्गत उभारले जाणारे प्रकल्प हे बुलेट ट्रेनच असणार असून, बुलेट ट्रेनची कार्यवाही करणार्‍या हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडूनच या मार्गांची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.

या मार्गांवरून ताशी 200 ते 250 किमी वेगाने रेल्वे धावू शकतील, असा रेल्वे मंत्रालयाचा दावा आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या विविध विभागातील अधिकार्‍यांना ’हायस्पीड’ मार्ग निश्‍चित करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. यामध्ये पुणे-मुंबईसह दिल्ली-अमृतसर, दिल्ली-पाटणा, हावडा-कोलकाता, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू-तिरुअनंतपुरम, दिल्ली-जयपूर-जोधपूर या मार्गांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. तसेच, पुणे रेल्वे प्रशासनानेही पुणे-मुंबई कॉरिडॉरच्या घोषणेला दुजोरा दिला आहे. सध्या पुणे-मुंबई दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्या तीन ते सव्वातीन तासांत अंतर पूर्ण करतात. हे अंतर कमाल एक ते दीड तासात पूर्ण करता यावे, हा हायस्पीड कॉरिडॉरचा उद्देश असणार आहे.

वेगवान वाहतुकीसाठी रेल्वेचे प्रयत्न
रेल्वे मंत्रालयाकडून वेगवान वाहतुकीसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे. ताशी 160 किमी वेगाने धावणारी गतीमान ही सेमी हाय स्पीड ट्रेन दीड वर्षांपूर्वी सेवेत दाखल करण्यात आली आहे. रेल्वेकडून चेन्नई येथील कोच उत्पादक फॅक्टरीमध्ये ट्रेन-18 व ट्रेन-20 या वेगवान गाड्यांची बांधणी केली जात आहे. या दोन्ही गाड्या ताशी 160 किमी वेगाने धावण्याच्या क्षमतेच्या आहेत.

भुसंपादनाची आडकाठी नाही
या कॉरिडॉरमध्ये प्रामुख्याने आर्थिक केंद्रे असलेल्या शहरांचा समावेश केला जाणार असून, हे मार्ग कमी अंतराचे असतील असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. हे मार्ग कमी अंतराच्या हवाई वाहतुकीचा पर्याय म्हणूनही वापरणे शक्य आहे. हे मार्ग एका सिंगल पिलरवर उभारावेत, महामार्गांवर एलिव्हेटेड मार्ग करावेत किंवा सध्या अस्तित्त्वात असलेल्या रेल्वे मार्गावर उभारावेत, असे मंत्रालयाने सूचित केले आहे. त्यामुळे जमीन संपादनाची आडकाठी येणार नसल्यामुळे खर्च देखील कमी येणार आहे.