नवी दिल्ली। काही महिन्यांपूर्वी प्रशासकीय लढाईत अडकेलेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघाला आता आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेने पुढील वर्षी होणार्या महिलांच्या जागतिक स्पर्धेच्या जोडीने 2021 मध्ये रंगणार्या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचे यजमानपद भारताला दिले आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या दोन दिवसीय बैठकीनंतर हो घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्श डॉ. चिंग कुआ वु म्हणाले की, भारतीय बॉक्सिंग महासंघाने खेळाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न बघून, दिल्लीमध्ये 2021 मध्ये पुरुषांची जागतिक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 2019 मध्ये पुरुषांची ही स्पर्धा सोच्चिमध्ये होईल. महिलांची जागतिक स्पर्धा 2019 मध्ये तुर्कस्तानच्या ट्राबझोनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच दोन महत्त्वाच्या स्पर्धा
भारतात पुढील वर्षी महिलांची आणि त्यानंतर 2021 मध्ये पुरुषांची जागतिक स्पर्धा भारतात होणार आहे. बॉक्सिंगमधील महत्वाच्या दोन स्पधाथ देशात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाचे प्रमुख अजयसिंग म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पालक संघटनेचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे. प्रशासकिय कारणांमुळे भारतीय बॉक्सिंग महासंघावर 2012 ते 16 दरम्यान बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर महासंघाने आंतरराष्ट्रीय संघटनेकडे जे सादरीकरण केले ते त्यांना पसंत पडले आहे. दरम्यान क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारतातील बॉक्सर्स, पदाधिकारी आणि या खेळाच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे, असे गोयल यांनी ट्वीट केले.
37 वर्षांनंतर पुन्हा
भारतात सुमारे 37 वर्षांनंतर पुुरुषांची जागतिक बॉक्सिंग स्पर्धा होईल. याआधी 1990 मध्ये ही स्पर्धा मुंबईत खेळवण्यात आली होती. या स्पर्धेनंतर 2006 मध्ये भारताने महिलांच्या स्पर्धेचे यजमानपद भुषवले होते. याशिवाय 2010 मध्ये भारतात राष्ट्रकुल बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली होती.