पुणे । जंगली महाराज रस्त्याच्या धर्तीवर महापालिकेकडून आता फर्ग्युसन रस्ताही स्मार्ट केला जाणार आहे. पुणे स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत हे काम केले जाणार असून त्यासाठी सुमारे 18 कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. या खर्चास सोमवारी एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले. हा रस्ता सुमारे 24 मीटर रूंद असून गरवारे चौक ते कृषी महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
पुणे स्ट्रीट प्रोग्राम
स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेकडून शहरातील रस्त्यावरील पदपथ तसेच पदपथांवर नागरिकांसाठी वेगवेगळया सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे स्ट्रीट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात महापालिकेकडून जंगली महाराज रस्त्यापासून करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता फर्ग्युसन रस्त्यावरही हे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेला प्रकल्प आराखडा तसेच खर्चाचा आराखडा पथ विभागाकडून एस्टीमेट कमिटीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली. समितीच्या मान्यतेनंतर या कामासाठीची निविदा प्रक्रीया राबवून त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
या रस्त्यावर तीन लेन असतील. त्यावर सुमारे साडेतीन मीटरचे पदपथ दोन्ही बाजूस असतील. याशिवाय पदपथाबरोबरच नागरिकांसाठी सायकल ट्रॅक असेल. या ट्रॅकच्या बाजूला दोन्ही बाजूला सुशोभीकरण करण्यात आलेले असेल. याशिवाय, या रस्त्यावर नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी आकर्षक स्पेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या रस्त्यावर दुर्तफा पार्किंगही असणार असून त्यासाठी जागा स्वतंत्र स्वरूपात तयार केलेल्या असतील. या प्रकल्पास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.