आता मंत्रिमंडळामध्ये जाण्यात अजिबात इच्छा राहिली नाही

0

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच मंत्रिमंडळ प्रवेशावरील चर्चेला दिला पूर्णविराम

मुंबई । आता जळगाव जिल्ह्यांच्या प्रश्‍नासाठी लढणार. मंत्रिमंडळात जाण्यात रस नाही, असे म्हणत मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना सरकारमध्ये समावेश आणि खडसेंचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्‍नांना खुद्द एकनाथ खडसेंनीच आता पूर्णविराम दिला आहे. या सरकारमध्ये मंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यासंह प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सभागृहात आणि सभागृहाबाहेर आवाज बुलंद करणार असल्याचे खडसे म्हणाले.

मंत्रिमंडळातील प्रवेशाविषयी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, आता मंत्रिमंडळात प्रवेशाची माझी इच्छाच उरली नाही. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. कृषी संशोधन संस्था आणि महाविद्यालयाचे प्रश्‍न कायम आहेत. जनता व्यथित असताना आता मंत्री होऊन करणार काय? सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला जाब विचारू, असे खडसेंनी सांगितले. खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी चौकशी करणार्‍या माजी न्यायमूर्ती झोटिंग यांनी सरकारला अहवाल देऊन सहा महिने उलटले. हा अहवाल मुख्य सचिवांकडे सीलबंद स्वरूपात ठेवण्यात आला आहे.

सरकार विरूद्ध दंड थोपटणार
मध्यंतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पक्षप्रवेशासाठी आलेले खुले आमंत्रण आणि खडसेंनी सरकारविरोधी दिलेले खुले आव्हान चर्चा रंगली होती. आता तर मंत्रिमंडळ प्रवेशाचा पर्यायावर स्वतःहून फुली मारल्याने नाथाभाऊंचे आगामी राजकारण प्रखर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. खडसेंनी पक्षासाठी 40 वर्षे काम केले असून वर्षभराहून अधिक काळ ते मंत्रिमंडळाबाहेर आहेत. त्यांना झाली एवढी शिक्षा पुरेशी आहे, असे मत सकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांचे आहे.