समन्वयक आबासाहेब पाटील यांनी जाहीर केली मराठी क्रांती मोर्चाची दिशा
29 जूनपासून आंदोलनाचे दुसरे पर्व; तुळजापूरमध्ये घालणार जागरण गोंधळ
पिंपरी-चिंचवड : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा महिन्यांपूर्वी दिले. मात्र, मागील दहा महिन्यांच्या कालावधीत कोणतीही ठोस कार्यवाही सरकारकडून झालेली नाही. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणार्या सरकार विरोधात मोठा असंतोष असून येत्या 29 जूनला तुळजापूरमध्ये जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरु करण्यात येईल. आता पुढील सर्व आंदोलने गनिमी काव्याने करून सरकारला धडा शिकवू, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शनिवारी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.
राज्यस्तरीय बैठकीतील माहिती
मोर्चाच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींची बैठक शनिवारी बालेवाडी येथे झाली. यानंतर पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारत या आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली. यावेळी शरद काटकर, विवेक पाटील, संतोष सूर्यराव, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, योगेश पवार, रामेश्वर भुसारी, शरद जाधव, सुरेखा सांगळे, ज्ञानेश्वर गायकवाड, अंबादास कातुरे, ज्ञानेश्वर कवडे, वैभव शिंदे, राजेंद्र देवकर, किरण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भुसारे, अमित धाडगे, हेमंत बर्गे, बाबा शिंदे, विवेकानंद बाबर, संजय सावंत, अनिल शिंदे, तुषार आमकरख महेश राणे, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री, या प्रश्नांची उत्तरे द्या!
मराठा आरक्षणाचे काय झाले? शेतकर्यांच्या कर्ज माफीचे काय झाले? शेती मालाला हमीभाव देण्याचे काय झाले? कोपर्डी प्रकरणाचे काय झाले? अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचे काय झाले? कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुदानाचे काय झाले? मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह देण्याचे काय झाले? अॅट्रोसिटीबाबत कमिटी नेमण्याचे काय झाले? ‘धर्मा पाटील’ यांच्या कुटूंबियांना मदत देण्याचे काय झाले? ‘रामेश्वर भुसारी’ याला मंत्रालयात मारहाण केली पुढे काय झाले? रायगडमध्ये मृत्यू पावलेला ‘अशोक उंबरे’ कुटूंबियांना मदत देण्याचे काय झाले? ‘योगेश पवार’ या युवकाने तुमच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्याचे काय झाले? या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिक्षण, नोकरीतील आरक्षणाचे काय?
त्याबरोबर आजच्या बैठकीत गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा समाज शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मागत आहे. तरी या समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे मराठा आरक्षण चालू शैक्षणिक वर्ष 2018 पासून लागू करावे आणि मराठा विद्यार्थ्यांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात. मराठा आरक्षण कधी लागू करणार याची मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर करावी. आरक्षण जाहीर होईपर्यंत मराठा समाजाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, आरक्षण मिळत नाही. तो पर्यंत मराठा समाजाच्या मुला, मुलींचा सर्व प्रकारचा शैक्षणिक खर्च, तसेच उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषि विभाग शिक्षण इत्यादी सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये शंभर टक्के फी माफी मिळावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, असेही ठराव बैठकीत झाले.
बैठकीत विविध ठराव
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे महामंडळ फक्त मराठा समाजासाठी सिमीत करुन त्याला राज्य शासनाने ताबडतोब अनुदान द्यावे. जेणेकरुन आर्थिक दुर्बल मराठा समाजाचा युवक, युवती उद्योग उभा करुन स्वत:च्या पायावर उभे राहु शकतील. तसेच मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतीगृह बांधून द्यावेत. तोपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख वार्षिक वसतिगृह भत्ता वाढवून द्यावा. सन 2014 मध्ये मराठा आरक्षण ईएसबीसी प्रवर्गातून भरती झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभागात तात्काळ सामावून घेण्यात यावे. तसेच एक वर्ष तात्पुरत्या स्वरुपाची नेमणूक दिलेल्या विद्यार्थ्यांना कायम करण्यात यावे, यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन तीन वर्षापासून रखडलेल्या मराठा विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करुन घ्यावे. अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचा गैरवापर रोखण्यासाठी तालुका व जिल्ह्यावर कमिटी स्थापन करण्यासंदर्भात शासन परिपत्रक काढण्यात यावे. शेतकर्यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा. शेतकर्यांचे सर्व कर्ज ताबडतोब माफ करावे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही स्वायत्त संस्था त्वरीत कार्यान्वीत करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचे ठराव बैठकीत झाल्याची माहिती देण्यात आली.