आता महापालिकेत परिवहन कक्षाची स्थापना

0
कार्यकारी अभियंता सवणे कक्षप्रमुखपद 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस सेवा, नॉन मोटाराईज ट्रान्सपोर्ट, बीआरटी, सीपीएम आणि मेट्रो या वाहतुकीशी संबंधित कामकाजाकरिता महापालिकेत ‘परिवहन कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे कक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी पारित केला.
शहराची वाढती लोकसंख्या, यामुळे पुढील काळात वाहतूक विषयांचे महत्व आणि प्राथमिकता वाढणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांची भौगोलिक संलग्नता विचारात घेता काही वाहतुकीशी संबंधित विषय, योजना सामाईकपणे आणि समन्वयाने हातळावे लागणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील परिवहनशी निगडीत असलेल्या सर्व पर्यायांचे दिर्घकालीन धोरण एकमेकांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी सक्षम अधिकार्‍यांच्या समावेश असलेल्या चार सदस्यीय परिवहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे परिवहन कक्ष प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय सोनवणे यांच्याकडे उपभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. सोनवणे यांच्यासह उपअभियंता संजय साळी आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता अनिल भोईर यांची परिवहन कक्षात बदली करण्यात आली आहे. नेमणूक केलेल्या अधिकार्‍यांच्या कामकाजाचे वाटप  कक्षप्रमुख करणार आहेत. बदली केलेल्या कर्मचा-यांची आस्थापना स्थापत्य मुख्य कार्यालयाकडे राहणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नियंत्रणाखाली हा कक्ष कामकाज करणार आहे.