पुणे-ठिय्या आंदोलनावेळी गोंधळ घालणारे मराठा आंदोलक नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे स्पष्ट करत यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नसून तालुका व जिल्हास्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे. पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
यापुढे रस्त्यावर न उतरता तालुका व जिल्हास्तरावर चक्री उपोषण केले जाईल. त्याचबरोबर आत्मक्लेश म्हणून १५ ऑगस्ट रोजी आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही शांतता बाळगण्याचे आवाहन करत होतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याकडून जे नुकसान झाले त्याची आम्ही जबाबदारी स्वीकारतो व त्याची भरपाई करून देऊ, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.
ज्यांनी तोडफोड केली ते मराठा आंदोलक नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अशांवर कारवाई करावी. पण ज्यांचा या तोडफोडीशी संबंध नाही. अशांवर गुन्हे दाखल केले जाऊ नयेत. आम्ही याबाबत पोलिसांशीही चर्चा केली. त्यांनीही जे निरपराध आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ असे आम्हाला आश्वस्त केले असले तरी प्रत्यक्षात कृती केले नसल्याचे ते म्हणाले.