आता विधवा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

0

बदलापूर । येत्या जागतिक महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर विधवा महिलांच्या कन्या दत्तक घेण्याची योजना राबवणार आहे. विधवा महिलांच्या कन्यादान योजना यशस्वी झाल्यानंतर आता विधवा महिलांच्या कन्या दत्तक घेण्याची योजना राबवणार आहे. या दत्तक घेतलेल्या कन्येने उच्च पदवी प्राप्त केली, तर त्यामुळे होणारा आनंद हा खरा आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक आनंद असणार आहे असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. राजकीय कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यावेळेस सप्टेंबर 2016 मध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार किसन कथोरे यांनी विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान योजना जाहीर केली होती. केवळ घोषणा करून ते थांबले नाहीत तर एका वर्षात विधवा महिलांच्या तब्बल 125 मुलींचे कन्यादान केले. 19 सप्टेंबर 2017 रोजी या सर्व कन्या आणि जावयांचा त्यांनी जाहीर सत्कार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे हस्ते केला होता. त्यानंतरही कन्यादान योजना सुरूच आहे. विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान करताना आपल्या असेही लक्षात आले आहे की अनेक महिलांच्या पदरी अगदी लहान मुली आहेत. त्यांच्या शिक्षणाचा तसेच भावी आयुष्याची विधवा महिलांना प्रचंड काळजी वाटत असते, अशा महिलांना मानसिक त्रासामुळे विविध व्याधी जडू लागल्या आहेत. अशा विधवा महिलांच्या मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आपण घेणार आहोत, असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

शैक्षणिक साहित्य व गणवेशाची जबादारी घेणार
प्राथमिक शिक्षणापासून पदवीच्या शिक्षणापर्यंतच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आपण घेणार आहोत. त्यासाठी त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य, गणवेश आदी सर्वांची जबादारी घेणार आहोत असे कथोरे यांनी सांगितले. त्या अनुषंगाने मुरबाड मतदारसंघात सर्व्हे सुरू केलेला आहे. विधवा महिलांची नोंद घेण्यात आलेली आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांना मुली किती त्यांचे शिक्षण कुठे आणि कितवीपर्यंत आहे आदी सर्व बाबीची माहिती या सर्र्व्हेेमधून घेण्यात येणार आहे. यासाठी महिला कार्यकर्त्या पुढाकार घेत आहेत, असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. दत्तक घेतलेल्या मुलींमधून काही मुलींनी जरी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, तरी त्यातून मिळणारा आनंद हा आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक आनंद असेल, अशी प्रतिक्रियाही आमदार किसन कथोरे यांनी यावेळी व्यक्त केली. विधवा महिलांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आमदारांनी घेतलेली आहे.