आता विमानतळांवर मराठीत होणार ‘अनाउन्सिंग’ !

0

नवी दिल्ली- देशातील सर्व विमानतळांवर सर्वात आधी स्थानिक भाषेमध्ये उद्घोषणा करण्याचे आदेश सरकारने विमानतळ व्यवस्थापकांना दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईसहीत राज्यामधील सर्वच महत्वाच्या विमानतळांवर आधी मराठीमध्ये प्रवाशांना सुचना देण्यात येतील. नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भातील आदेश दिला आहे. यापुढे प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेमध्ये उद्घोषणा होईल त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये सूचना देण्यात येतील.

एएआयच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विमानतळांवर आधी स्थानिक भाषेमध्ये प्रवाशांना सुचना देण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. विमानतळाबरोबरच खाजगी विमान कंपन्यांनाही स्थानिक भाषांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश सरकारमार्फत देण्यात आले आहेत. एएआयच्या अंतर्गत येणाऱ्या देशातील शंभर विमानतळांवर आता स्थानिक भाषांमध्ये प्रवाशांना सुचना देण्यात येणार असल्याने अनेकांना ते फायद्याचे ठरणार आहे.

ज्या विमानतळांवर उद्घोषणा होत नाहीत अशा सायलेन्ट एअरपोर्टसला यामधून वगळण्यात आले आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी एएआयने परिपत्रक जारी करुन अशा सुचना दिल्या होत्या मात्र त्यांची योग्यप्रकारे अंमलबाजवणी करण्यात आली नाही. मात्र आता थेट नागरी उड्डाण मंत्र्यांनीच ही सुचना दिल्याने लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.