आता वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता आणा..

0

जळगाव । वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक स्पर्धा निर्माण झाली आहे. डॉक्टरांमधील स्पर्धेमुळे वैद्यकीय क्षेत्र हे पैसेवाल्यांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पुर्वीपासून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात बाजारीकरण वाढले असून मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता निर्माण झालेली होती. सामान्य गोर-गरीब जनतेला आरोग्यसेवा कमी खर्चात उपलब्ध व्हावी व वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता यावा यासाठी माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅम्सकॉन 2017’ या अ‍ॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय दोन दिवशीय परिषदेचे आयोजन शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज येथे करण्यात आले आहे.

’खोके’ पध्दतीला लगाम
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय हे काही मोजक्या लोकांच्या ताब्यात असून वैद्यकीय प्रवेशासह शिक्षणासाठी बेसुमार फी आकारली जाते. पॅरामेडीकल कायदा अमलात आणणार असून याचा विरोध होत आहे मात्र वैद्यकीय क्षेत्रातील घराणेशाही बंद करुन खोके पध्दतीला लगाम लावण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. डॉक्टरांनी रुग्णासहीत नातेवाईकांना समाधानकारक वागणुक द्यावी कारण डॉक्टरांच्या चांगल्या सल्ल्यानेच रुग्ण 70 टक्के बरा होतो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सेवाकार्याची घेतली दखल
वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्रीपद हे व्यवसायाने डॉक्टर असलेल्यांना मिळत होते मात्र मी डॉक्टर नसतांना केवळ माझ्या आरोग्य सेवेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर या खात्याची जबाबदारी टाकण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याचा रहिवासी असल्याने जिल्ह्यात अधिकाधिक वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नेहमी कटीबध्द असल्याचे त्यांनी नमुद केले.

एक टक्काही खर्च नाही
परदेशात आरोग्यक्षेत्रात जीडीपीच्या निम्मे खर्च केले जाते. मात्र भारतात एकुण ’जीडीपीचा’ एक टक्काही खर्च करण्यात येत नसल्याची खंत आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केली. जागतीक बँकेच्या अहवालानुसार खाजगी आरोग्य सेवा 80 टक्के तर सरकारी आरोग्यसेवा केवळ 20 टक्के पुरविली जात असल्याचे समोर आले आहे. आत्महत्येला कर्जबाजारीपणा जबाबदार आहे आरोग्यावरील खर्च सर्वाधिक जबाबदार असल्याने सांगितले.

विविध प्रश्‍नांवर चर्चा
या परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थिती होती. डॉक्टर लोकांना येणार्‍या अडचणी, समस्या तसेच आएमएच्या भविष्यातील वाटचाल तसेच विविध प्रश्‍नावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ.अशोक तांबे, डॉ.पार्थिव संघवी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.विश्वेश अग्रवाल, डॉ.राजेश पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.राज नगरकर, डॉ. एन.एस.आर्वीकर, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.विक्रांत धोपाडे, डॉ.अनिल पाटील, डॉ.रविंद्र कुटे, डॉ.प्रताप जाधव, डॉ.विलास भोळे आदी उपस्थित होते.