आता शासनाचे ‘आपलं मंत्रालय’ मासिक

0

मुंबई:- प्रसिद्धीच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करणाऱ्या भाजप सरकारने आता मंत्रालयातील घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी ‘आपलं मंत्रालय’ हे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात होणारे कार्यक्रम, घडामोडींची माहिती सर्व अधिकारी वा कर्मचाऱ्यांना अवगत व्हावी यासाठी हे मासिक सुरू करणार असल्याचा शासन निर्णय काढला आहे. या नियमित निघणाऱ्या मासिकात मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या यशाच्या गाथा, कर्तुत्वाचा आलेख, पदोन्नती, निवृत्ती, नाविन्यपूर्ण कामगिरी आदी बाबींचा समावेश असणार आहे.

हिंदी- गुजराती लोकराज्य कशाला?
महाराष्ट्र सरकारने मराठी लोकराज्य या सरकारी मासिकाचे हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये देखील प्रकाशन प्रायोगिक तत्वावर सुरू केले होते. आता या प्रायोगिक तत्वावरील मासिकांना नियमित करण्याचे शासन आदेश निघाले आहेत. लोकराज्य हे शासनाचे मासिक यामुळे आता नियमितपणे हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये देखील प्रकशित होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या मुद्य्यावर शासनावर कडाडून टीका केली आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्रात कमी लोकसंख्या असलेल्या बाहेरील लोकांसाठी हिंदी-गुजरातीमध्ये लोकराज्य कशाला? असा सवाल केला आहे. हा मराठी भाषेवर अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.