आता स्थायीचे नवे अध्यक्ष कोण?

0

पुणे  । महापालिकेची आर्थिक सत्ता मानल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना चिठ्ठीद्वारे वगळण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ व काँग्रेसचे अविनाश बागवे यांना झटका बसला आहे. या चिठ्ठ्यांमध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेना एक आणि काँग्रेसच्या एका सदस्याला बाहेर पडावे लागले. समितीचे विद्यमान अध्यक्षांना बाहेर पडावे लागल्यामुळे समितीचे नवीन अध्यक्ष कोण? याचीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीची स्थापन करण्यात आली, याला एक वर्षे पूर्ण झाले. स्थायी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो, परंतु दरवर्षी अर्ध्या म्हणजे 8 सदस्यांना समितीतून बाहेर पडावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व 16 सदस्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या करून 8 सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या जातात. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याप्रमाणे समितीच्या साप्ताहिक सभेत बुधवारी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या चिठ्ठ्या उपस्थित अधिकार्‍यांनी उचलल्या. प्रत्येक चिठ्ठी उचलली जाण्यापूर्वी सदस्यांमध्ये उत्सुकता आणि तणाव होता. अध्यक्ष मोहोळ यांच्या नावाने चिठ्ठी उचलली गेली तेव्हा एकदम शांतता पसरली.

नवे सदस्य फेब्रुवारीत
ज्या पक्षाचे सदस्य वगळले गेले त्याजागी त्याच पक्षाचे सदस्य महापालिकेच्या मुख्य सभेत निवडले जातील, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली. नवे सदस्य फेब्रुवारी महिन्यात निवडले जातील आणि अध्यक्ष निवड मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल.

चिठ्ठीनुसार वगळले गेलेले आठ सदस्य
मुरली मोहोळ (भाजप), योगेश समेळ (भाजप), हरिदास चरवड (भाजप),अनिल टिंगरे(भाजप),रेखा टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रिया गदादे (राष्ट्रवादी काँग्रेस),अविनाश बागवे (काँग्रेस), नाना भानगिरे (शिवसेना).

उर्वरित सदस्य : सुनील कांबळे (भाजप), नीलिमा खाडे (भाजप), कविता वैरागे (भाजप), राजा बराटे (भाजप), मंजुषा नागपुरे (भाजप), मारुती तुपे (भाजप), दिलीप बराटे (राष्ट्रवादी काँग्रेस), आनंद आलकुंटे (राष्ट्रवादी काँग्रेस).

काकडे यांचे नेतृत्व मानणारे
समितीमध्ये भाजपचे चार सदस्य नव्याने निवडले जातील तेव्हा अध्यक्ष पदासाठी स्पर्धा अधिक रंगेल. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. विद्यमान महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ हे तिघेही भाजपचे प्रथमपासूनचे कार्यकर्ते आहेत.
पक्षात 98 पैकी 40 नगरसेवक नव्याने आलेले आहेत आणि त्यांपैकी बहुतांश खासदार संजय काकडे यांचे नेतृत्व मानणारे आहेत. यातून अध्यक्ष निवडला जाईल का? याची उत्सुकता राहील. नवीन सभासद निवडीत हे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल.