आत्मनिर्भर, आधुनिक भारताची निर्मिती होणे महत्वाचे – नरेंद्र मोदी

। नवी दिल्ली । आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते अर्थसंकल्पाबाबत भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

संसदेत काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारताला आधुनिकतेकडे नेणार्‍या अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत, असे ते म्हणाले. सरकारने गेल्या सात वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत आहे. 60 वर्षापूर्वी भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन 1 लाख 10 कोटी रुपये होतं, ते आता सुमारे 2 लाख 30 हजार कोटी रुपये झाले आहे. देशाचा परकीय चलन साठा 200 अब्ज डालर्सवरुन 630 अब्ज डालर्सपर्यंत वाढला आहे. हे सारे सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे घडले, असे ते म्हणाले. आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे, दिशा योग्य आहे आणि वेग भरधाव आहे, असे ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प गरीब, मध्यवर्गीय आणि युवकांवर भर देणारा, तसेच त्यांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणारा आहे. सेंद्रीय शेतीवर भर देत भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणाकडे या अर्थसंकल्पात लक्ष
दिले आहे. गरिबांना 80 लाख पक्की घरे देण्यासाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. त्यामुळे गरीबीवर मात करुन या वर्गाला पुढं जाता येईल, असे ते म्हणाले.
सीमावर्ती गावांमधून होणारे स्थलांतर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगले नाही, हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात वायब्रंट व्हिलेजेस योजना प्रस्तावित केली आहे.
तेलबियांची आयात कमी करण्याचा, खाद्यतेलात देशाला आत्मनिर्भर करण्याचा निर्धार अर्थसंकल्पात आहे. खेळांसाठी गेल्या सात वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद तिपटीने वाढली आहे, याचा फायदा युवकांना होईल, स्टार्टअपसाठी प्रस्तावित करतरतुदींचालाभही युवकांना होईल, डिजीटल रुपीमुळे आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी खुल्या होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. गेल्या सात वर्षात सरकारने 50 हजार किलोमीर्टसचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत हजारो किलोमीटर लांबीचे नवे राष्ट्रीय महामार्ग तयार केले, असे त्यांनी सांगितले.