आत्मविश्‍वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जा!

0

जळगाव। स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असल्यास अशा परीक्षांना आत्मविश्‍वासाने सामोरे जायला शिका असे प्रतिपादन युपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रांजल पाटील यांनी केले. दर्जी फाऊंडेशन आयोजित यशोत्सव व अनुभव कथन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पालकांसमोर ते बोलत होते. युपीएसएसी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या उमेदवार व पालकांचा सह्यदय सत्कार करता यावा यासाठी दर्जी फाऊंडेशनतर्फे यशोत्सव व अनुभव कथन कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोररोज निंबाळकर व पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून नितीन बानुगडे पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह पालकही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षा हा सर्वोत्तम पर्याय
क्षेत्र कोणतेही असो यात पुढे जायचे असेल तर मनात न्युनगंड निर्माण होवू देऊ नका. वेळेप्रसंगी अपयश पदरी पडले तरीही हिम्मत न हारता ठरविलेले ध्येय साध्य होईपर्यंत आपली वाटचाल सुरूच ठेवायला हवी. जीवन जगत असतांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. परंतु धैर्याने या संकटांचा मुकाबला केला तर आपला मार्ग सुकर होत जातो. आजच्या युवकांना स्पर्धा परीक्षा हा सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु यासाठी आत्मविश्‍वास खूप मोलाचा असतो. असे मत प्रांजल पाटील यांनी व्यक्त केले. युपीएसएसीतील यशस्वी डॉ. सौरभ सोनवणे, कुलदीप सोनवणे व उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले निलम बाफना यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभवा…
पद जेवढे मोठे असते तेवढ्याच जबाबदार्यांही मोठ्या असतात. यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळत असते. आपल्या कार्यातून इतरांचे समाधान तर झालेच पाहिजे. परंतु आपणही जबाबदार्यांचे भान ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभवायला हवे असे मत पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप पाटील व आभार रामकृष्ण करंके यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दर्जी फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले.

संस्कृती टिकली तर माणूसकी टिकेल
आजच्या तरूणाईवर पाश्‍चात्य विचारांचा प्रभाव होत आहे. सोशल मिडियाचा चांगला वापर न करता यातून भावनांचा उद्रेक होईल अशा बातम्या अनेकवेळा पसरविल्या जातात. म्हणून सोशल मिडियाच्या माध्यमातून चांगल्या विचारांचीच देवाण-घेवाण करायला हवी. भारतीय संस्कृतीचे जतन हे आजच्या तरूणाईच्या हातात आहे. कारण संस्कृती टिकली तर माणूसकी टिकेल आणि यातून भारतीय संस्कृती विश्‍वविख्यात होईल असे मत नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.

परिक्षेतील यश इतरांनाही प्रेरणादायी
आपल्या प्रास्ताविकातून दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये खान्देशातील मिळविलेले दैदिप्यमान यश हे इतरांनाही प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्यांना योग्य दिशा मिळावी व यशस्वीत्यांनाही आपल्या यशाचा उत्साह कुटूंबासह साजरा करता यावा यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. जुलै महिन्यापासून दर्जी फाऊंडेशन ख्वाँजामिया चौकातील नवीन इमारती स्थलांतरित होत आहे. यशाचा हा उत्साह यापुढेही नेण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे मत त्यांनी व्यक्त केले.