आदर्शनगरातील महिलेचा जळून मृत्यू

0

जळगाव। शहरातील आदर्शनगरातील विवाहित महिला वैशाली संतोष गाढे या जळाल्याने त्यांना गुरूवारी सकाळी खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतू, 95 टक्के जळाल्याने त्यांचा दुपारी 3.42 वाजेच्या सुमारास उचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, दुपारी महिलेच्या माहेरच्या रूग्णालयाबाहेर एकच आक्रोश करत सासरच्याच मंडळींनी घातपात केल्याचा आरोप त्यांनी केला. यातच दोन्ही कुटूंबांमध्ये वादही झाल्याने त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रामानंद पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप घेवून परिस्थिती हाताळली. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहाडी रस्त्यावरील आदर्श नगरात वैशाली गाढे ह्या पती संतोष व मुलगी ओजल व मुलगा सोहम यांच्यासह राहत होत्या. तर संतोष हे एका खाजगी फायनान्स कंपनीत कामाला आहेत. गुरूवारी सकाळीच वैशाली ह्या जळाल्याने त्यांना संतोष गाढे यांनी वैशाली यांना लागलीच रिंगरोड येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू जास्त प्रमाणात त्या जळाल्याने त्यांना लागलीच आकाशवाणी चौकातील अ‍ॅपेक्स हॉस्पीटल येथे हलविण्यात आले. यातच सकाळी 8 वाजता वैशाली यांच्या भुसावळ येथील माहेरच्या मंडळींना गाढे कुटूंबियांनी फोन करून मुलगी जळाल्याची माहिती दिल्याने माहेरच्या मंडळींनी त्वरील जळगाव येवून रूग्णालय गाठले. मात्र, दुपारी 3.42 वाजेच्या सुमारास वैशाली यांचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

नातेवाईकांचा आक्रोश
दुपारी वैशाली गाढे यांचा मृत्यू झाल्याची माहिती माहेरच्यांना तसेच नातेवाईकांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला. यातच विवाहितेच्या आईने मनहेलवणारा आक्रोश करत हंबरडा फोडला होता. दरम्यान, रूग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे गोंधळाचे वातारण निर्माण झाले होते. रामानंदनगर पोलिसांनी विवाहित महिलेचे मृत्यू अगोदर जबाब नोंदवून घेतले होते. गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही देण्यात आला होता. तर सायंकाळी दोन्ही कुटूंबियांच्या नातेवाईकांमध्ये हाणामारीही झाल्याचे प्रकरण
चांगलेच चिघळले होते.

विवाहितेचा घातपात केल्याचा आरोप
पती संतोष तसेच सासु-सासर्‍यांनीच मुलगी वैशाली हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेल्या तीन दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होते. नेहमीच तिचा छळ केला जात होता, असा आरोपही विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. घटनास्थळी रामानंदनगर पोलिसांनी घेवून माहेरच्या मंडळींची समजूत घातली. मात्र, संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळी व नातेवाईकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रूग्णालयात झाला वाद
सायंकाळी दोन्ही माहेरची व सासरची मंडळी आमने-सामने आल्यानंतर दोघात जोरदार वाद होवून हाणामारी झाली. यामुळे वातावरण अजून चिघळले. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करत वाद शांत केला. यानंतर पती संतोष व विवाहितेच्या सासू-सासर्‍यांना रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांचेही जबाब नोंदवून घेतले. यानंतर माहेरच्या मंडळींनाही पोलिसांनी बोलवून त्यांचे म्हणणे एकून घेतले.