चाळीसगाव । तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी आदर्श आमदार ग्राम म्हणून वाघळी या गावाची निवड केले आहे. आदर्श ग्रामयोजनेंतर्गत विविध विकास कामे करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांकडून 450 शोषखड्डे, 225 शौचालये, गायी म्हशींचे 160 गोठे असे एकूण 835 प्रस्ताव मिळाली आहे. या सर्व प्रस्तावांना तात्काळ मंजुरी द्यावे असे निर्देश आमदार उन्मेश पाटील यांनी दिले आहे. 13 मे पर्यंत या सर्व प्रस्तावांना मंजूरीसह लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आदेश पंचायत समिती मध्ये झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषद कृषी सभापती पोपट भोळे, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, तहसिलदार कैलास देवरे, गट विकास अधिकारी मधुकर वाघ, सदस्य सुनिल पाटील, भाऊसाहेब केदार, कैलास निकम, रुपाली साळुंखे, अजय पाटील, मायाबाई पाटील, दिनेश बोरसे, सरपंच विकास चौधरीयांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न
गावातील 27 कुपोषीत बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधींनी कुपोषीत बालक दत्तक घेऊन गाव कुपोषणमुक्त करण्याचा निर्धारही केला आहे. महसूल प्रशासनामार्फत महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखले वाटप करण्याच्या सुचनाही महसूल प्रशासनास देण्यात आल्या. जलयुुक्त शिवार योजनेंतर्गत 1318 कुटूंबाचा सर्व्हेक्षण करण्यात आले असून 2 हजार 293 हेक्टर शेत जमीनी सिंचनाखाली आणण्यासाठी या गावाची जलयुक्त शिवारात निवड करण्यात आली आहे. गावातील शाळा डिजीटल करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले वितरीत करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
मोतीबिंदू मुक्तीचा मानस
गावातील एकही नागरिकास मोतीबींदू राहणार नाही यासाठी आरोग्य प्रशासनाने शिबीराचे आयोजन करुन मोतीबींदूची तपासणी व शस्त्रक्रीया करुन संपुर्ण गांव मोतीबींदूमुक्त करण्याच्या सुचनाही आमदारांनी यावेळी दिल्या. शासनाच्या विविध योजनांचे लाभ यापुढे रोख स्वरुपात देण्यात येणार नसल्याने गावातील 100 टक्के नागरिकांचे बँक खाते उघडली जाणार असून प्रत्येक बँक खातेधारकांचा बारा रुपये भरून विमा भरला जाणार आहे. ग्रामस्थांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून काम करणे हे प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचार्याचे कर्तव्य आहे आणि हे त्यांनी लोकसेवक या नात्याने पार पाडणेही गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.