नाना शिवले यांनी साधला संवाद
चिंचवड : महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका आणि लोकगीते यांना नृत्य, नाट्य, संगीत या सादरीकरणाच्या मूल्यांची जोड मिळाली. त्यातून साहित्यातील मराठमोळा लोकरंग उभा राहिला. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते या सर्वांच्या एकत्रिकरणांतून पहायला मिळते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती होय. कलांवंतानी लोकपरंपरेचे लौकिकीकरण करुन अभिजनांच्या परंपरेत समाविष्ट होणे आणि अभिजनांच्या परंपरेने लोककलांच्या कलाघटकांचा स्वीकार करणे या आदान प्रदानांतून लोककलांचे बदलते स्वरुप समाजापुढे उभे राहील हे निश्चित, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी तिसरे लोककला संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यातील दुसर्या सत्राच्या मुलाखतीत ते लोककला या विषयावर बोलत होते. नाना शिवले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
लोककला ही निरुपणप्रधान
मुलाखतीमध्ये देखणे पुढे म्हणाले की, आजच्या अभिजात रंगभूमीचा जन्म लोकरंगभूमीतून झाला आहे. महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरुपणप्रधान आहे. निवेदन, निरुपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते. लोकसाहित्याचे विश्व व्यापक आहे. पण या व्यापक विश्वाला पुन्हा एका रंगमंचाच्या विश्वावर उभे करायचे काम लोककलांनी केले आहे. कलावंताची आणि लोककलांची परंपरा अगदी प्राचीन काळापासून प्रवाहीत राहिली आहे. म्हणूनच लोककला कधीही साचेबंद किंवा बंदिस्त नाही तर ती मुक्त आणि प्रवाही आहे. शाहिरी, लावणीबरोबरच केवळ लोक धर्माचा भाग म्हणूनच गोंधळ, जागरण, भारुड यांचे स्थान राहिले, पण लोकधर्माचे पुरोहित म्हणून त्याची गरज समाजाला भासू लागली. पारंपरिक लोककलांची ओढ म्हणून तुटलेपणाच्या जाणिवेतून आपल्या कलाविष्कारांना संजीवक सामर्थ्य देण्यासाठी अभिजात परंपरेतील कलावंतही वापर करुन आपल्य कलानिर्मितीला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न करीत आहे
लोककलांवतांमुळे महाराष्ट्र भावसाक्षर
लोककलेच्या संवर्धनाबाबत बोलताना डॉ. देखणे म्हणाले, संतांनी महाराष्ट्राला ज्ञानसाक्षर केले, सुधारकांनी बुध्दीसाक्षर केले, तर लोककलांवतांनी महाराष्ट्राला भावसाक्षर केले. लोककलाकारांना केवळ लोककलाकार म्हणून नव्हे तर लोकसाहित्यकार म्हणून प्रतिष्ठा मिळायला हवी. अशा लोककलांकडे पाहण्याची समाजाची भूमिका बदलायला हवी. अजूनही लोककलावंताकडे अभिजात कलाकारांच्या भूमिकेतून पाहिले जात नाही. लोककला या एकेकाळी राजाश्रय आणि लोकाश्रेयावर जगत होत्या. आज त्यांचा राजाश्रय तर संपला आहेच पण आधुनिक समाजरचनेच्या पार्श्वभूमीवर आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा लोकाश्रयही संपला आहे. त्यामुळे कलेच्या अंगाने आता जगणे दुरापास्त झाले आहे. या कला जगवायच्या असतील तर लोककलाकार जगले पाहिजेत. त्यासाठी लोककलांना राजाश्रय मिळायला हवा अशी अपेक्षा डॉ. देखणे यांनी व्यक्त केली.