आदित्य बिर्ला रुग्णालयात आयुर्वेदावर कार्यशाळा उत्साहात

0

आयुर्वेद सेंटरच्या वेबसाईटचे उद्घाटन

चिंचवड : फॅमिली फिजिशियन्स अससोसिएशन यांच्यावतीने आदित्य बिर्ला रुग्णालयात घेण्यात आलेली आयुर्वेद विषयावरील कार्यशाळा मोठ्या उत्साहात नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत 250 डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी केरळचे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ व वक्ते डॉ. गोपाकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोव्याचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. उपेंद्र दीक्षित, डॉ. रणजित निंबाळकर, डॉ. प्रशांत सुरू उपस्थित होते. डॉ. नितीन भिसे, डॉ. संगीता गायकवाड आणि डॉ. दीपाली भिसे संचालित त्रिमर्म आयुर्वेद या ‘फ्रँचायजी’ तत्वावर सुरू करण्यात आलेल्या आयुर्वेद सेंटरच्या वेबसाईटचे उद्घाटन डॉ. गोपाकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

आयुर्वेद या चिकित्सा शास्त्राद्वारे रुग्णांची सेवा करू इच्छिणार्‍या व आयुर्वेद क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणार्‍या नवीन तरुण बी.ए.एम.एस. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘त्रिमर्म आयुर्वेद’ची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या संयोजनात फॅमिली फिजिशियन्स अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज हेळंबे, डॉ. प्रशांत माने, डॉ. गणेश भोईर, डॉ. अनिकेत अमृतकर, डॉ. संगीता गायकवाड, डॉ. नितीन भिसे, डॉ. दीपाली भिसे, डॉ. पद्मनाभ केसकर, डॉ. विजय शिर्के यांनी पुढाकार घेतला.